दारू पाजण्यास नकार दिल्याने रिक्षाचालकावर हल्ला! – सागर बारसमोर मारहाण, भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भुसावळ : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
दारू पाजण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून मित्रानेच एका रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना भुसावळ शहरात घडली आहे. या प्रकरणी जखमी रिक्षाचालकाने बाजारपेठ पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
शेख जाकीर शेख हुसैन (वय ३७, रा. गौसिया नगर, अफताब किराणा जवळ, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि. ११ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास ते लाल जैन मंदिराजवळील सागर बार येथे बसले होते. त्यावेळी त्यांचा मित्र राहुल सुरवाडे हा तेथे आला व “तु मला आज दारू पाज” अशी मागणी केली. फिर्यादीने त्यास नकार दिल्याने आरोपी राहुलला संताप आला. त्याने शिवीगाळ करून फिर्यादीच्या चेहऱ्यावर मुठीने मारहाण केली.
मारहाणीमुळे जाकीर हे जमिनीवर पडले. त्यानंतर राहुल बाहेर गेला. जाकीर यांनी तात्काळ आपल्या मित्र शुभम पचरवाल याला फोन करून मदतीस बोलावले. शुभम घटनास्थळी आला व बारचे शटर लावून घेतले. काही वेळ थांबून दोघे घरी निघण्याच्या तयारीत असतानाच शटर उघडताच राहुल पुन्हा आला व जाकीर यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी तसेच हातातील ‘फायटर’ने मारहाण केली.
या हल्ल्यात जाकीर गंभीर जखमी झाले. शुभम यांनी तत्काळ त्यांना रिक्षाने ग्रामीण रुग्णालय, भुसावळ येथे दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालय, जळगाव येथे पाठविले. उपचारानंतर शेख जाकीर यांनी आज बाजारपेठ पोलिस ठाण्यात येऊन आरोपी राहुल सुरवाडे (रा. लाल जैन मंदिर, भारच्या मागे, भुसावळ) याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

