शहर व परिसरात मुरुम चोरी चे प्रमाण वाढले महसूल विभागाचे सोयीस्करपणे डोळेझाक
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – वरणगाव शहरासह परिसरात अवैध मुरुम उत्खनन आणि चोरीने जोर धरला असून महसूल विभाग मात्र कुंभकर्ण झोपेत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. प्लॉट विकासाच्या नावाखाली रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरच्या साहाय्याने बिनधास्त मुरुम चोरी केली जात असून, यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे.
रात्री मुरुम वाहतूक; ट्रॅक्टरचा गोंगाट,नागरिक त्रस्त
शहरातील महालक्ष्मीनगर,साईनगर, सम्राटनगर,मकरंदनगर,महात्मा फुलेनगर आदी कॉलन्यांमध्ये घरांचे बांधकाम सुरू असून, प्लॉटची लेव्हल करण्यासाठी दर प्लॉट मागे ३० ते ४० ट्रॅक्टर मुरुम लागतो.तसेच कठोरा, जाडगाव,तळवेल,हतनूर,बोहर्डी आदी शिवार ही सर्व वाहतूक रात्रीच्या अंधारात बिनधास्त केली जाते.नागरिकांचे म्हणणे आहे की, ट्रॅक्टरना कुठलाही अधिकृत परवाना नाही,ना उत्खननाची परवानगी.फक्त ट्रॅक्टरचाच आवाज नाही,तर यामुळे कॉलन्यांतील रस्त्यांचीही अक्षरशः धुळधाण झाली आहे. रात्री झोप लागत नाही,मुले आणि वृद्ध त्रस्त आहेत.
सिद्धेश्वरनगर व फॅक्टरी परिसरात खुलेआम मुरुम चोरी
सिद्धेश्वरनगरमधील महादेव ट्रस्टच्या जमिनीवर तसेच वरणगाव फॅक्टरीजवळील मिलींदनगर परिसरात जेसीबीच्या सहाय्याने मुरुम उपसा सुरू आहे.मुरुम चोरांशी बांधकाम व्यावसायिकांचे थेट संबंध असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.महसूल विभागाने जर थेट प्लॉटधारकांवर कारवाई केली,तर खरी नावे समोर येऊ शकतात.
शासनाची फसवणूक, महसूल बुडीत –
शासनाच्या नियमाप्रमाणे उत्खननासाठी योग्य त्या परवानग्या घेणे बंधनकारक आहे. मात्र सध्या कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता मुरुम उपसा सुरू असून, शासनाचा मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा होत आहे.
फक्त आदेश, कृती नाही !
भुसावळ प्रांताधिकाऱ्यांनी महसूल विभागाला स्पष्ट आदेश दिले असले तरी,तालुक्यात कुठेही कारवाई होताना दिसत नाही.नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सर्वच अधिकारी पंधरवडा कार्यक्रमांमध्ये गुंतलेले असून,जमिनीवरील वस्तुस्थितीकडे कोणीच लक्ष देत नाही.
नागरिकांची संतप्त मागणी – त्वरित कारवाई करा !
हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या भागांमध्ये मुरुम चोरी थेट नागरीकांच्या नजरेत आहे. तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने हे एका संगनमताचे लक्षण असल्याची शक्यता नागरिक मांडत आहेत.या चोरीमुळे केवळ सरकारच नव्हे, तर सामान्य माणसाचे जगणेही कठीण झाले आहे. झोप उडते, रस्ते खराब होतात, आणि कायद्याचा गळा घोटला जातो,” असा संतप्त सूर शहरात उमटत आहे.
आता प्रश्न असा — प्रशासन जागे कधी होणार ? अपघात किंवा मोठ्या चुकीनंतर का ?
नागरिकांची एकच मागणी आहे.मुरुम चोरी थांबवा,कारवाई करा,आणि कायद्याला योग्य तो मान द्या तर गौण खनिज उत्खनन कमी होईल . मागील काळात काही अधिकारी व कर्मचारी लाच घेतांना पकडले गेले तरी सुद्धा वरीष्ठाकडून दखल घेतली जात नाही .