Saturday, December 13, 2025
Homeजळगावनोकरी कायम करण्यासाठी १५ लाख घेतले, कामावरून काढल्याने मू.जे. महाविद्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

नोकरी कायम करण्यासाठी १५ लाख घेतले, कामावरून काढल्याने मू.जे. महाविद्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

नोकरी कायम करण्यासाठी १५ लाख घेतले, कामावरून काढल्याने मू.जे. महाविद्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – कामाच्या ठिकाणी होणारा मानसिक त्रास आणि नोकरी कायमस्वरूपी करण्याचे आश्वासन देऊन लाखो रुपये उकळल्यानंतरही कामावरून काढून टाकल्याच्या तीव्र नैराश्यातून जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचारी महेश भास्करराव सावदेकर (वय ५२, रा. देविदास कॉलनी) यांनी सोमवारी (दि. १७ नोव्हेंबर) विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे जळगावात मोठी खळबळ उडाली असून, संतप्त नातेवाईकांनी थेट महाविद्यालयाच्या प्रांगणात मृतदेह आणून दोषी संस्थाचालकांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करत तीव्र आंदोलन सुरू केले आहे.

१५ लाख घेऊनही नोकरी गेली

महेश सावदेकर हे मू.जे. महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते. कुटुंबियांनी केलेल्या गंभीर आरोपानुसार, महेश यांना कायम नोकरीत घेण्यासाठी संस्थाचालकांना तब्बल १५ लाख रुपये देण्यात आले होते. तसेच, कागदोपत्री जास्त पगार दाखवून त्यांना प्रत्यक्षात कमी वेतन दिले जात होते. दीड महिन्यांपूर्वी कोणत्याही ठोस कारणाशिवाय त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. नोकरी परत मिळवण्यासाठी त्यांनी वारंवार विनंती केली, मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. याच सततच्या त्रासातून आणि नैराश्यातून त्यांनी सोमवारी दुपारी राहत्या घरी विष प्राशन केले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृतदेहासह महाविद्यालयात ठिय्या

महेश सावदेकर यांच्या आत्महत्येची बातमी कळताच संतप्त झालेले त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांनी न्याय मिळेपर्यंत मृतदेह न हलवण्याचा पवित्रा घेतला. त्यांनी मृतदेह थेट मू.जे. महाविद्यालयाच्या आवारात आणून संस्थाचालकांविरोद्ध तीव्र घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. दोषी पदाधिकाऱ्यांवर खून व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी लावून धरली आहे. घटनेमुळे महाविद्यालयाच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या