यावल तालुक्यात रात्री अवैध वाळू वाहतुकीचा धुमाकूळ. सीसीटीव्हीतही वाहने दिसत नसल्याने ‘अदृश्य शक्ती’ची चर्चा.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि. २४ – यावल तालुक्यात रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.पोलीस स्टेशनपासून आणि यावल महसूल आणि फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयापासून अवघ्या पाचशे मीटर ते एक किलोमीटर अंतरावरील रस्त्यांवरून रात्रीच्या अंधारात वाळूची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
तालुक्यातील नागरिकांमध्ये आणि वाळू व्यावसायिकांमध्ये यावरून तीव्र चर्चा सुरू आहे. अवैध वाहतूक करणाऱ्यांना कुणाचा आशीर्वाद आहे, यावरून तर जिल्हास्तरावरही दखल घेतली जावी अशी मागणी होत आहे.
ठळक मुद्दे :
पोलीस स्टेशन आणि तहसीलच्या नाकावरून वाहतूक
रात्रीच्या सुमारास शहरातील मुख्य रस्त्यांसह ग्रामीण भागातील रस्त्यांवरून डंपर, ट्रॅक्टर, ट्रक यांमधून वाळूची वाहतूक होत असल्याचे बोलले जात आहे.कार्यालयांच्या जवळूनच ही वाहतूक होत असतानाही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सीसीटीव्हीत वाहने दिसत नाहीत, मग ‘अदृश्य शक्ती’ कोणाची?
ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने तसेच तसेच गस्त घालणाऱ्या पोलीस आणि महसूल पथकाला दिसत नसल्याची चर्चा तालुक्यात आहे.
त्यामुळे या वाहतुकीमागे एखाद्या ‘अदृश्य शक्ती’चा प्रभाव आहे का.? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
अदृश्य शक्ती संबंधित अधिकाऱ्यांवर आपला प्रभाव टाकीत असल्याने वशिला असलेल्यांना सूट, आणि वशिला नसलेल्यांवरच कारवाई ?
अवैध वाळू वाहतुकीत ज्यांचे वशिले नाहीत, त्यांच्याच वाहनांवर कारवाई होत असल्याची चर्चा वाळू वाहतूकदारांमध्ये आहे.प्रभाव असलेल्यांची वाहने मात्र तपासणीतून सुटत असल्याचा आरोप केला जात आहे.
‘वाळू बंद’ असल्याचा कांगावा, आतून मात्र कलेक्शन सुरू?
तालुक्यात वाळू बंद असल्याचा कांगावा केला जात असताना, प्रत्यक्षात कलेक्शन झालेली रक्कम संबंधितांना कमी प्रमाणात वाटण्यासाठी हा दिखावा केला जात असल्याची चर्चा आहे. कलेक्शन करणारे पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत दर महिन्याला लाखो रुपयांचे कलेक्शन करून अवैध धंदे बंद असल्याचा कंगावा आणि सांगावा देत असल्याचेही बोलले जात आहे.
शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतोय —
अवैध वाळू वाहतुकीमुळे शासनाचा वर्षाला कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याची चर्चा शासकीय वर्तुळात आहे.अनेक वाहनांकडे अधिकृत परवाने नसतानाही त्यांची वाहतूक सुरू असल्याने महसूल बुडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्हास्तरीय संयुक्त गस्ती पथकाची मागणी
यावल शहरासह तालुक्यात रात्रीच्या वेळी केवळ तालुकास्तरीय नव्हे, तर जिल्हास्तरीय पोलीस आणि महसूल विभागाचे संयुक्त गस्ती पथक प्रभावी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बऱ्हाणपूर – अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गासह ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या संशयित डंपर, ट्रॅक्टर, ट्रक व इतर वाहनांची सखोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
अनधिकृत वाहने तपासताना ‘अदृश्य शक्ती’चा प्रभाव पडत असल्याने कलेक्शन करणारे सोयीनुसार कलेक्शन करीत असल्याचा आरोपही होत आहे.
आता जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक काय करणार?
या सर्व प्रकारामुळे तालुक्यातील जनतेत संताप व्यक्त करण्यात येत असून अदृश्य शक्तीचे नाव समोर यायला पाहिजे अशी मागणी होत आहे.केवळ कारवाईचा देखावा न करता, जिल्हास्तरावरून विशेष पथक नेमून रात्रीची अचानक तपासणी, सीसीटीव्ही फुटेजची स्वतंत्र तपासणी आणि कलेक्शनच्या आरोपांची चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
अवैध वाळू वाहतूक आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी प्रशासन ठोस पावले उचलणार का,याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

