Monday, November 23, 2026
Homeजळगावतापीची पाणीपातळी घटली; कठोरा जॅकवेलचा फुटबॉल उघडा पडला!

तापीची पाणीपातळी घटली; कठोरा जॅकवेलचा फुटबॉल उघडा पडला!

तापीची पाणीपातळी घटली; कठोरा जॅकवेलचा फुटबॉल उघडा पडला!
वरणगावकरांवरील संभाव्य पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी नगरपालिकेची धावपळ; जॅकवेलपासून १०० ते १५० मीटर अंतरावर नदीपात्रात टाकली पाणबुडी
मुख्याधिकारी राहुल भोये, नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या पुढाकाराने युद्धपातळीवर उपाययोजना; कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक

वरणगाव     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी         ता भुसावळ : तापी नदीची पाणीपातळी झपाट्याने खालावल्याने वरणगाव शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या कठोरा जॅकवेलसमोर तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. नदीतील पाणीपातळी घटल्याने जॅकवेलजवळील पाण्याचा फुटबॉल उघडा पडल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, संभाव्य पाणीटंचाईचे गांभीर्य ओळखून वरणगाव नगरपालिकेने तातडीने पर्यायी व्यवस्था उभी केली. जॅकवेलपासून सुमारे १०० ते १५० मीटर अंतरावर तापी नदीपात्रात पाणबुडी टाकून पाणी उपसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

तापी नदीची पाणीपातळी कमी झाल्यामुळे कठोरा जॅकवेलमधून पाणी उचलण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. ऐनवेळी ही समस्या निर्माण झाल्यास संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकला असता. त्यामुळे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वेळेचे महत्त्व ओळखून तातडीने काम सुरू केले. नदीपात्रातील प्रतिकूल परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून पाणबुडी टाकण्याची मोहीम हाती घेतली. अनेक तासांच्या मेहनतीनंतर पर्यायी व्यवस्था उभी करण्यात आली.

शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये आणि पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडू नये, यासाठी मुख्याधिकारी राहुल भोये आणि नगराध्यक्ष सुनील काळे यांनी विशेष लक्ष देत आवश्यक उपाययोजनांसाठी पुढाकार घेतला. प्रशासनाच्या तत्पर निर्णयामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

या कामात नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील निलेश झांबरे, मुख्तार खान, वासुदेव भोई, शंकर जावळे, मयूर भंगाळे, जतिन सपकाळे, अमोल भोई, किरण जाधव, वाल्मिकी जाधव आणि प्रमोद कोळी यांनी प्रत्यक्ष मेहनत घेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. नदीपात्रात उतरून प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या