वरणगांव येथे स्ट्रांग रूम चा विज पुरवठा खंडीत .
ईव्हीएम सुरक्षेवर शंकास्पद वातावरण

वरणगांव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथे नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमचा विज पुरवठा बंद झाला होता या कारणाने सुरक्षेबाबत संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. चोवीस तास सीसी टिव्ही बंदोबस्त असतांना लाईट गेल्यावर सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून आले आहे .
बुधवारी सकाळी रात्री दीड वाजेच्या सुमारास अचानक नगरपरिषद कार्यालयातील लाईट बंद झाल्याची घटना घडली. त्याचबरोबर बुधवारी दिवसा सुद्धा काही काळासाठी स्ट्रॉंग रूम परिसरातील CCTV फुटेज बंद असल्याचेही निदर्शनास आले. या दोन्ही घटना अत्यंत संशयास्पद असल्याचा आरोप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र विश्वनाथ चौधरी तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार योगिता आबाजी सोनार आणि इतर उमेदवारांनी केला आहे.
उमेदवारांचे म्हणणे आहे की, ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेली आहेत, त्या ठिकाणी 24 तास कडेकोट सुरक्षा असणे आवश्यक आहे. मात्र, अचानक लाईट बंद होणे आणि काही काळासाठी CCTV यंत्रणा बंद राहणे, ही बाब निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तातडीने सुनियोजित आणि मजबूत सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
या घटनेनंतर उमेदवारांसोबत मोठ्या संख्येने सामान्य मतदारही नगरपरिषद परिसरात उपस्थित राहिले होते. भारताच्या लोकशाहीतील सर्वात मोठ्या उत्सवावर, म्हणजेच निवडणुकीच्या प्रक्रियेवर कुठल्याही प्रकारचा आघात होऊ नये, यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, असा सूर सामान्य नागरिकांमधूनही उमटताना दिसत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाकडे निवडणूक प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येत असून, स्ट्रॉंग रूमची सुरक्षा अधिक कडक करण्याची मागणी जोर धरत आहे. येत्या मतमोजणीपूर्वी या संशयास्पद प्रकारांचा सखोल तपास व्हावा, अशी अपेक्षा उमेदवार आणि मतदार दोघांनीही व्यक्त केली आहे.

