भुसावळातील संतोषी माता बहु उद्देशीय हॉल प्रशासनाकडून सील
प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केली कारवाई
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ शहरातील मातृभूमी चौकाजवळ असलेला बहुचर्चित संतोषी माता बहुउद्देशीय हॉल अखेर प्रशासनाने सील केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सोमवारी न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित हॉलवर सील लावण्याची कारवाई केली.
सदर हॉलमधील साहित्याबाबत मंगळवारी पंचनामा करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हॉलच्या जागेबाबतचा भाडेकरार संपुष्टात आलेला असताना देखील हॉलचा वापर सुरू असल्याने तसेच यासंदर्भात विविध तक्रारी प्राप्त झाल्याने ही कारवाई करण्यात आली.
माहितीनुसार, सन २००० मध्ये झालेल्या करारनाम्यास आजपर्यंत वैध मंजुरी मिळालेली नव्हती. असे प्रांत अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे . यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयानेही हॉल चालविणाऱ्या संस्थेच्या विरोधात आदेश दिला असून, संबंधित संस्थेकडून हॉलचा वापर करून आर्थिक लाभ घेतला जात असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी जळगाव यांना प्राप्त झाल्या होत्या.

हॉल सील करण्याच्या वेळी नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कारवाईनंतर हा हॉल महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आला आहे. एकाच वेळी दोन ते तीन लग्न कार्य होतील एवढा मोठा हा हॉल असून शासकीय निम शासकीय कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी घेतले जात होते . या ठिकाणी टेंट हाऊस मालकांचे व संस्थेचे साहीत्य असल्याचे वृत्त आहे
मंगळवारी या बाबत माहिती घेवुन रितसर साहीत्याबाबत निर्णय घेतला जाईल परंतु सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही सिल लावण्याची प्रक्रिया पार पडून नगरपालिकेकडे हॉलची चाबी देण्यात आली आहे . साडेतीन तास ही प्रक्रीया सुरू होती .
या घटनेमुळे भुसावळ शहरात मोठी चर्चा सुरू असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

