बारावीच्या इंग्रजी पेपरला चार कॉपीप्रकरणे उघड; सीसीटीव्हीमुळे गैरप्रकारांवर लगाम
पहिल्याच दिवशी ६८४ परीक्षार्थी गैरहजर; केंद्रांवर कडक तपासणी
जळगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी राज्यभरात मंगळवार, दि. १० फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होताच पहिल्याच इंग्रजीच्या पेपरमध्ये पाचोरा तालुक्यात चार विद्यार्थ्यांवर कॉपीप्रकरणी कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर यंदा सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे करण्यात आल्याने तसेच प्रवेशद्वारावरच तपासणीची कडक व्यवस्था केल्याने गैरप्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, पहिल्याच दिवशी ६८४ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारल्याची नोंद झाली.
जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी एकूण ४५ हजार ११६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४४ हजार ४३२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली, तर ६८४ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. पाचोरा येथील शेठ एम. एम. कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात एका विद्यार्थ्यावर, तर निर्मला दत्तात्रय तावरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तिघांवर प्राथमिक शिक्षण विभागाच्या पथकाने कारवाई केली. उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेली यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
दरम्यान, गणेश कॉलनी परिसरातील बाहेती महाविद्यालयाजवळ काही टवाळखोर तरुणांची गर्दी झाल्याचे दिसून आले. परीक्षार्थ्यांचे लक्ष विचलित होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त असला तरी काही जणांनी कॉपी पुरविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती; मात्र केंद्रातील कडक सुरक्षा आणि कॅमेऱ्यांच्या देखरेखीमुळे हे प्रयत्न निष्फळ ठरले.
पहिलाच पेपर असल्याने अनेक पालक आपल्या पाल्यांना सोडण्यासाठी केंद्रांवर आले होते. पेपर सुटल्यानंतर एकाच वेळी मोठी गर्दी रस्त्यावर आल्याने नूतन व बेंडाळे महाविद्यालय परिसरात वाहतूक कोंडी झाली. पालकांमध्ये पेपर कसा गेला याची उत्सुकता दिसून येत होती.
यंदा प्रत्येक वर्गात व केंद्र परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य केल्याने कॉपीवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाल्याचे स्पष्ट झाले. इंग्रजीचा पेपर कठीण गेल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. मात्र, पहिल्याच दिवशी ‘कॉपीमुक्त’ परीक्षेचा प्रभावी अनुभव प्रशासनाने दिल्याचे चित्र जिल्हाभर पाहायला मिळाले.

