बैलगाडीतून नवरदेवांची वरात अन् फुगड्यांचा फेर; जळगावात १९ जोडपी विवाहबद्ध!

जळगाव | खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
सामाजिक ऐक्य आणि साधेपणाचा नवा आदर्श घालून देत, अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ व बहिणाई ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी (२२ फेब्रुवारी) जळगावात भव्य सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या मंगलमयी सोहळ्यात १९ जोडपी विवाहबंधनात अडकली असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीने या सोहळ्याला ‘शाही’ स्वरूप प्राप्त झाले होते.
बैलगाडी मिरवणुकीने जपली परंपरा
सोहळ्याची सुरुवात रविवारी सकाळी ११ वाजता जुन्या जळगावातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरापासून झाली. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे नवरदेवांची निघालेली पारंपरिक मिरवणूक. आधुनिक वाहनांचा थाट टाळून सर्व नवरदेव सजवलेल्या बैलगाड्यांवर स्वार झाले होते. संभळ, टाळ-मृदुंगाचा गजर आणि महिलांनी रस्त्यावर धरलेला फुगड्यांचा फेर यामुळे संपूर्ण जळगाव शहर लेवा संस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघाले होते. ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून जात काशीबाई कोल्हे शाळेजवळील ‘मीराई लॉन’ येथे विसावली.
मान्यवरांची मांदियाळी
या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले. त्यांच्यासह महापौर दीपमाला काळे, आमदार राजूमामा भोळे, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका केतकीताई पाटील, युवा नेते धनंजय चौधरी आणि हभप भरत महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेवा एज्युकेशन युनियनचे उल्हास चौधरी, कौशल पाटील, दीपक चौधरी, स्वप्निल चौधरी, सिंधूताई कोल्हे, विष्णू भंगाळे, जयश्री महाजन, सीमाताई भोळे आणि सोहम खडके यांनी विशेष परिश्रम घेतले.
नियोजनाचा ‘बहिणाई’ पॅटर्न
बहिणाबाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा आशाताई कोल्हे, वर्षा बोरोले, सुनीता येवले आणि वैशाली झोपे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीने चोख नियोजन केले होते. तर, युवक महासंघाचे प्रकाशराव पाटील, राजेश चौधरी, प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे आणि जिल्हाध्यक्ष मधुकर भंगाळे यांनी या उपक्रमाद्वारे समाजाला एकतेचा संदेश दिला.
खर्चाला फाटा, संसाराला आधार
अवाढव्य खर्च टाळून सर्वसामान्य कुटुंबांवरील आर्थिक भार हलका करण्याच्या या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. सोहळ्याच्या शेवटी सर्व नवविवाहित जोडप्यांना आयोजकांतर्फे संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. संपूर्ण जिल्ह्यातील लेवा पाटीदार समाजबांधवांच्या उपस्थितीमुळे ‘मीराई लॉन’चा परिसर जनसागराने ओसंडून वाहत होता.

