१० हजारांचे २ लाख भरले, तरीही छळ सुरूच : सुसाईड नोट लिहून युवकाची आत्महत्या
चोपडा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – अवैध सावकारीचे जाळे गरिबांच्या जीवावर उठल्याची एक धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात उघडकीस आली आहे. अवघ्या १० हजार रुपयांच्या कर्जापोटी तब्बल २ लाख रुपये व्याज भरूनही, सावकाराचा छळ थांबत नसल्याने एका हतबल तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली. योगेश सुनील चौधरी असे या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून अवैध सावकारांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, योगेश हा मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याने पिंटू नावाच्या एका व्यक्तीकडून १० हजार रुपये उसने घेतले होते. या तुटपुंज्या रकमेसाठी संशयित सावकाराने योगेशकडे व्याजाचा तगादा लावला होता. धक्कादायक बाब म्हणजे, योगेशने आतापर्यंत व्याजापोटी तब्बल २ लाख रुपये दिले होते. तरीही सावकाराची पैशांची हाव संपली नव्हती.
सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा :
२५ तारखेला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास योगेशने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना त्याच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली असून, त्यात त्याने छळाची भीषण वास्तविकता मांडली आहे. “सावकार पिंटू याने मला मारहाण केली आणि माझ्या वृद्ध आई-वडिलांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली,” असे त्याने चिठ्ठीत नमूद केले आहे. या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचे सांगत, “पिंटूला कडक शिक्षा व्हावी,” अशी शेवटची इच्छा योगेशने व्यक्त केली आहे.
कुटुंबाचा आधार हरपला :
योगेशच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. मोलमजुरी करून जगणाऱ्या या कुटुंबाचा मुख्य आधार हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सुसाईड नोटच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.

