Wednesday, April 15, 2026
Homeकृषीयांत्रिकीकरणाकडे शेतकऱ्यांचा कल; २३०० शेतकऱ्यांना १५.८४ कोटींचे अनुदान

यांत्रिकीकरणाकडे शेतकऱ्यांचा कल; २३०० शेतकऱ्यांना १५.८४ कोटींचे अनुदान

यांत्रिकीकरणाकडे शेतकऱ्यांचा कल; २३०० शेतकऱ्यांना १५.८४ कोटींचे अनुदान
जळगाव :   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             वाढती मजूर टंचाई आणि शेतीकामातील विलंब टाळण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेला जळगाव जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील २३०० हून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत २३५७ विविध यंत्रे व औजारे खरेदी केली असून, त्यासाठी तब्बल १५ कोटी ८४ लाख रुपयांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानांतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी आधुनिक यंत्रसामग्री खरेदीसाठी अनुदान दिले जाते. या योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळताना दिसत आहेत.
ट्रॅक्टरला सर्वाधिक पसंती
योजनेत सर्वाधिक प्रतिसाद ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळाला असून ७५६ शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेतले आहेत. यासाठी एकट्या ट्रॅक्टर घटकावरच ९ कोटी १० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. याशिवाय पॉवर टिलर, पॉवर वीडर, रोटावेटर, पलटी नांगर आणि कम्बाइन हार्वेस्टरसारख्या यंत्रांनाही शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.
यंत्र खरेदी व अनुदानाचा तपशील
ट्रॅक्टर : ७५६ – ₹९.१० कोटी
पॉवर टिलर : ७२ – ₹३७ लाख
पॉवर वीडर : १३३ – ₹६१ लाख
कम्बाइन हार्वेस्टर : १ – ₹७.६७ लाख
पलटी नांगर : १२६ – ₹६७.७५ लाख
रोटावेटर : १६५ – ₹६७.६३ लाख
शेतीसाठी यांत्रिकीकरण गरजेचे
वाढत्या मजुरीच्या खर्चामुळे शेती परवडणारी ठेवण्यासाठी यांत्रिकीकरण हाच प्रभावी पर्याय ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाकडून डीबीटीद्वारे थेट अनुदान मिळत असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
कोट :
“वाढत्या मजुरीच्या खर्चामुळे शेती परवडणारी ठेवण्यासाठी यांत्रिकीकरण हाच एकमेव पर्याय आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून, शासनाकडून थेट अनुदान दिले जात आहे.”
— कुर्बान तडवी, जिल्हा कृषी अधीक्षक, जळगाव

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या