Wednesday, April 15, 2026
Homeजळगावबोगस शालार्थ आयडी प्रकरणी एसआयटीच्या नोटिसांचा धडाका

बोगस शालार्थ आयडी प्रकरणी एसआयटीच्या नोटिसांचा धडाका

बोगस शालार्थ आयडी प्रकरणी एसआयटीच्या नोटिसांचा धडाका
११ शिक्षणाधिकाऱ्यांसह ४८ जणांना हजर राहण्याचे आदेश; १५ ते १८ एप्रिलदरम्यान सुनावणी
जळगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
शिक्षण विभागातील गाजलेल्या बोगस शालार्थ आयडी प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) कारवाईचा वेग वाढवला असून, जळगाव येथील माध्यमिक शिक्षण विभागातील तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह एकूण ४८ जणांना सुनावणीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या सर्वांना नाशिक येथे १५ ते १८ एप्रिलदरम्यान हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस
राज्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे ६०० हून अधिक शिक्षकांचे बोगस शालार्थ आयडी तयार करून कोट्यवधी रुपयांचा पगार लाटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील काही शाळांनी आवश्यक पडताळणी न करता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केल्याचे समोर आले आहे.
पूर्वीही झाली होती चौकशी
ऑक्टोबर २०२५ मध्ये नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावात येऊन दहा शाळांच्या मुख्याध्यापकांची चौकशी केली होती. त्यावेळी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली होती आणि संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
एसआयटीकडून चौकशीचा फास आवळला
प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने शासनाने एसआयटीला तपासासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता चौकशी अधिक तीव्र करण्यात आली असून, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
चार दिवस चालणार सुनावणी प्रक्रिया
सन २०१३ ते २०२६ या कालावधीत नाशिक विभागातील शालार्थ प्रणालीत समाविष्ट करण्यात आलेल्या ८९२ कर्मचाऱ्यांच्या आयडीमध्ये अनियमितता आढळून आली आहे. याच पार्श्वभूमीवर जळगावमधील ४८ जणांची सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.
११ शिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश
या नोटिसांमध्ये ११ तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह उपशिक्षणाधिकारी, कक्षाधिकारी तसेच वरिष्ठ व कनिष्ठ सहाय्यकांचा समावेश आहे. आर. डी. विसपुते, एस. बी. हिंगोणेकर, एस. टी. वराडे, डी. पी. महाजन, बी. जे. पाटील, बी. एस. अकलाडे, डॉ. नितीन बच्छाव, सचिन परदेशी, डॉ. किरण कुंवर, डॉ. एम. व्ही. कदम यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
या प्रकरणामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या