वरणगाव परिसरातील भारत गॅस गोडाऊन फोडून ५८ सिलिंडर चोरी
वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शहराजवळील बोहर्डी शिवारातील लालमाती परिसरात असलेल्या भारत गॅस गोडाऊनमध्ये अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून ५८ भरलेले गॅस सिलिंडर चोरी केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. चोरीस गेलेल्या सिलिंडरांची एकूण किंमत सुमारे ७४ हजार १२४ रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
याप्रकरणी गॅस एजन्सीचे संचालक नरेंद्र उत्तमराव आहिरे (वय 51, रा. शांतिनगर, भुसावळ) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची रोहंत गॅस एजन्सी ही भारत गॅस कंपनीची वितरक असून मुख्य कार्यालय मकरंद नगर, वरणगाव येथे आहे.
संबंधित गोडाऊनमध्ये जळगाव येथून आलेल्या भरलेल्या सिलिंडरांचा साठा ठेवला जातो.
फिर्यादीनुसार, २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी गोडाऊनमध्ये १९५ सिलिंडर शिल्लक होते. गोडाऊन कीपरने दोन कुलपे लावून चाव्या मालकाकडे दिल्या होत्या. मात्र २६ फेब्रुवारी रोजी सकाळी गोडाऊनचे कुलूप तोडलेले आढळून आले. गोडाऊनच्या बाहेर पाच सिलिंडर पडलेले दिसून आले, तर ५८ सिलिंडर चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.
विशेष म्हणजे, गोडाऊनमध्ये मागील दोन वर्षांपासून सुरक्षारक्षक नव्हता तसेच सीसीटीव्ही कॅमेरे २१ फेब्रुवारीपासून बंद स्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी वरणगांव पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

