भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे १२ एप्रिल रोजी लेडीज इक्वॅलिटी रनचे आयोजन”
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या वर्षी देखील भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे खास महिलांसाठी धावण्याची स्पर्धा अर्थात बिसारा लेडीज इक्वॅलिटी रनचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी ही स्पर्धा १२ एप्रिल रोजी संपन्न होईल. या संदर्भात चर्चा करण्यासाठी असोसिएशनच्या नियमित धावपटूंची बैठक डॉ चारुलता व डॉ तुषार पाटील यांच्या निवासस्थानी नुकतीच संपन्न झाली.
मार्च महिन्यात परीक्षा असल्याने शालेय विद्यार्थिनींना व पर्यायाने त्यांच्या कुटुंबातील महिलांना सहभागी होण्यास अडचण येते. शिवाय महिलादिनी शासकीय व विविध संस्थांचे कार्यक्रम असतात. अधिकाधिक महिला व विद्यार्थिनींना या रनमध्ये सहभागी होता यावे म्हणून हा रन एप्रिल मध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष प्रा. प्रविण फालक यांनी दिली.
या स्पर्धेच्या समन्वयक म्हणून डॉ निलीमा नेहेते व डॉ चारुलता पाटील यांची सर्व महिलांच्या उपस्थितीत एकमुखाने निवड करण्यात आली. शिवाय यावर्षी नावनोंदणी केवळ ऑनलाईन पद्धतीने होणार आहे असे ठरले.
स्पर्धा ३ किमी, ५ किमी व १० किमी या तीन गटात होणार असून प्रत्येक सहभागी स्पर्धकास आयोजकांतर्फे स्पर्धेच्या आदल्या दिवशी टी शर्ट व धाव यशस्वीपणे पूर्ण केल्यावर पदक व प्रमाणपत्र देण्यात येईल. शिवाय ५ किमी व १० किमीचा रन हा टाईमिंग रन असून आरएफआयडी प्रणालीद्वारे प्रत्येक धावपटूस स्वतंत्र बिब क्रमांक देण्यात येईल व धाव पूर्ण झाल्यावर धावपटूंच्या भ्रमणध्वनीवर किती वेळेत धाव पूर्ण झाली याचा संदेश प्राप्त होईल. विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेचे बक्षिसे व स्मृतिचिन्ह , शिवाय इतर स्पर्धकांना लकी ड्रॉ द्वारे आकर्षक बक्षिसे व भेटवस्तू मिळतील असे देखील आयोजकांनी सांगितले. शिवाय धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी संस्थेचे स्वयंसेवक धावण्याच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पेयजल, एनर्जी ड्रिंक व खाद्यपदार्थांची व्यवस्था करतील. त्याशिवाय मैदानावर प्रत्येकास नाश्ता दिला जाईल.
ऑनलाईन नावनोंदणी सुरु झाली असून संस्थेच्या नियमित महिला धावपटूंनी दाखविलेल्या उत्साहामुळे अल्पावधीत १०० हुन अधिक महिलांची नावनोंदणी झाल्याची माहिती प्रविण पाटील यांनी दिली.
शिवाय १२ एप्रिल रोजी प्रत्येक महिलेची धाव ही कुठल्याही दुखापतीशिवाय आनंददायी असावी हा उद्धेश डोळ्यासमोर ठेवून दर मंगळवार, गुरुवार व रविवारी सकाळी ६.०० ते ७.०० या वेळेत शहरातील कृष्णचंद्र सभागृहाशेजारील मोकळ्या जागेत प्रशिक्षण व सराव सत्रांचे आयोजन करण्यात येईल व सर्व १५ सराव सत्र नि:शुल्क असतील. याची सुरुवात मंगळवार, ३ मार्च पासून होईल अशी माहिती देखील त्यांनी दिली.
यावेळी गणसिंग पाटील, प्रशांत चौधरी, प्रशांत वंजारी, संजय तिवारी, नीलकंठ नेमाडे, प्रमोद शुक्ला, संजय चौधरी आदी पुरुष धावपटू व असोसिएशनच्या सर्व नियमित महिला धावपटू मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
लेडीज रन संदर्भात चर्चा करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर असोसिएशनचे धावपटू

