आदिवासी खातेदार नोंदणीस टाळाटाळ
फैजपूरच्या तलाठ्याविरुद्ध शिस्तभंग चौकशी; तीन सदस्यीय समितीची नियुक्ती
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी मनवेल (ता. यावल) : जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशांकडे दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने कारभार केल्याच्या आरोपावरून फैजपूर येथील तलाठ्याविरुद्ध शिस्तभंग चौकशी सुरू करण्यात आली आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर ‘आदिवासी खातेदार’ म्हणून नोंद करण्यासाठी जात प्रमाणपत्राची सक्ती केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. माहिती अधिकारातून या प्रकरणातील धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांकडे दुर्लक्ष
जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी २०१६ मध्ये दिलेल्या शासकीय आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ३६ व ३६अ अंतर्गत ‘आदिवासी खातेदार’ म्हणून नोंद करताना जात प्रमाणपत्र किंवा वैधता प्रमाणपत्राची अट लागू नसते. संबंधित शेतकऱ्याच्या कुळवहिवाटीचा पुरावा व महसूल नोंदींच्या आधारे ही नोंद करणे बंधनकारक आहे.मात्र फैजपूर येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) श्रीकांत देवराव केंद्रे यांनी वरिष्ठ कार्यालयाच्या या आदेशांकडे दुर्लक्ष करून आदिवासी शेतकऱ्यांकडून जात प्रमाणपत्राची सक्ती केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शेतकऱ्याची थेट तक्रार
फैजपूर येथील एका आदिवासी टोकरे कोळी समाजातील शेतकऱ्याने या प्रकाराला कंटाळून तलाठी केंद्रे यांच्याविरुद्ध थेट शिस्तभंगाची तक्रार दाखल केली आहे. संबंधित शेतकऱ्याने माहिती अधिकार कायद्यांतर्गत कागदपत्रे मिळवून या प्रकरणाचा पाठपुरावा केला असून त्यातून वरिष्ठ आदेशांचे उल्लंघन झाल्याची बाब समोर आली आहे.
तीन सदस्यीय समितीकडून तपास
प्रशासनाने या तक्रारीची गंभीर दखल घेत तीन सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे. समितीला प्रकरणाचा सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कारवाईकडे सर्वांचे लक्ष
शासकीय व न्यायालयीन आदेश धाब्यावर बसवून सर्वसामान्य आदिवासी शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या नावाखाली त्रास दिल्याचा आरोप असलेल्या या प्रकरणात आता प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

