पं. प्रदीप मिश्रा यांचा शिवमहापुराण कथेला सुरुवात; सुमारे एक लाख शिवभक्तांची उपस्थित!
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – पाडळसे येथील अकलूद शिवारात मंगळवारपासून पं. प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा सुरू झाली. पहिल्याच दिवशी ४१ अंशांपेक्षा जास्त तापमान असले तरी शिवभक्तांची श्रद्धा त्यावर भारी पडली. सुमारे एक लाख भाविकांनी कथा श्रवण केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या गर्दीमुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून भुसावळ ते फैजपूर मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद केला.१० ते १६ मार्च दरम्यान आयोजित या सात दिवसीय कथा यज्ञासाठी मंगळवारी पहाटेपासूनच भाविकांचे गृप अकलूद शिवाराकडे

निघाले. दुपारी उन्हाचा त्रास टाळण्यासाठी अनेकांनी सकाळी लवकर कथा स्थळ गाठले. मात्र, दुपारी रखरखते उन असले तरी भाविकांचा उत्साह टिकून होता. तापी पुलापासून कथास्थळापर्यंतचा मार्ग वाहनांसाठी बंद केल्याने भाविकांना रणरणत्या उन्हात पायी प्रवास करावा लागला. काही दानशूर वाहनधारकांनी स्वतःच्या कारद्वारे भाविकांना, विशेषतः महिलांना कथास्थळी पोहोचवून मदतीचा हात दिला.
भाविकांच्या सोयीसाठी भुसावळ आगारातून १५

बसेसची सोय कथेला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी भुसावळ आगाराने १५ विशेष बस तैनात केल्या आहेत. यावल, जामनेर, जळगाव आणि मुक्ताईनगर भागातून येणाऱ्या भाविकांसाठी यावल रोडवर भव्य बस पार्किंगची व्यवस्था आहे. दुपारपर्यंत या पार्किंगमध्ये १० हून अधिक बस आणि शेकडो खासगी वाहने दाखल झाली होती. कथा संपल्यावर शहरात व विशेष नाहाटा चौफुली व बस स्थानकाकडे जाणाऱ्या बस भाविकांनी फुल्ल भरून जात होत्या. दोन तास गर्दी कायम होती.
प्रशासकीय यंत्रणा हायअलर्टवर, २०० पोलिसांनी ठेवला बंदोबस्त
एवढ्या मोठ्या जनसमुदायावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस प्रशासनाने चोख नियोजन केले आहे. जळगाव रोडपासून कथास्थळापर्यंत सुमारे २०० पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड तैनात करण्यात आले.फैजपूरचे डीवायएसपी अनिल बडगुजर आणि भुसावळचे केदार बारबोले यांनी कथास्थळाकडे येणाऱ्या कोणत्याही मार्गावर अडचण येऊ नये यासाठी बंदोबस्ताचे नियोजन केले. भुसावळ शहरातील गांधी पुतळ्यापासून ते तापी पुलापर्यंत ठिकठिकाणी बंदोबस्त होता.

पं. प्रदीप मिश्रा हे रस्ते मार्गाने सोमवारी रात्री ९ वाजता भुसावळात दाखल झाले. तापी नगरात त्यांच्या निवासाची व्यवस्था केली आहे. मंगळवारी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपासूनच त्यांचा निवास असलेल्या परिसरात भाविकांनी गर्दी केली. कडेकोट पोलिस बंदोबस्तात दुपारी २.०७ वाजता ते कथास्थळाकडे रवाना झाले. अवघ्या सात मिनिटांत त्यांचे कथास्थळी आगमन झाले. यावेळी हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला.तापी पुलापासून उत्तरेकडील कथास्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी थंड पेय, उसाचा रस, पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लागले आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे या परिसराला एखाद्या मोठ्या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. दरम्यान, पूल ओलांडल्यावर फैजपूरकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या व खासगी वाहनांना बंदी होती. यावेळी काही भाविकांनी थेट कथास्थळापर्यंत वाहने नेण्याचा आग्रह धरला. मात्र, पोलिसांनी त्यांना वाटेतच थांबवत नकार दिला. यामुळे अनेकांनी इतर पर्यायी मार्गाचा वापर केला.

