Friday, March 13, 2026
Homeचाळीसगाववीर महाराणा प्रताप चौकातील अतिक्रमणांवर नगरपालिकेची धडक कारवाई; रस्ते मोकळे

वीर महाराणा प्रताप चौकातील अतिक्रमणांवर नगरपालिकेची धडक कारवाई; रस्ते मोकळे

वीर महाराणा प्रताप चौकातील अतिक्रमणांवर नगरपालिकेची धडक कारवाई; रस्ते मोकळे

चाळीसगाव   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी               : शहरातील प्रमुख व वर्दळीच्या वीर महाराणा प्रताप चौक परिसरात वाढलेल्या अतिक्रमणांवर चाळीसगाव नगरपालिकेने गुरुवारी धडक कारवाई करत रस्ते मोकळे केले. सार्वजनिक रस्ते, फूटपाथ व चौक परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेली हातगाड्या, तात्पुरती शेड्स, स्टॉल्स तसेच इतर अतिक्रमणे हटवण्यात आली. या कारवाईमुळे काही काळ परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
वीर महाराणा प्रताप चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा चौक असल्यामुळे येथे वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र काही व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला व फूटपाथवर अतिक्रमण करून व्यवसाय मांडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. तसेच पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असल्याने नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही मोहीम राबवली.

 

Oplus_131072

कारवाईदरम्यान नगरपालिकेच्या पथकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाड्या, तात्पुरते शेड, टेबल व इतर साहित्य हटवून काही साहित्य जप्तही केले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे अनेक अतिक्रमण धारकांनी आपले साहित्य तत्काळ हटवले.
या मोहिमेत उपमुख्याधिकारी देवेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग प्रमुख दिनेश जाधव, आरोग्य निरीक्षक विजय जाधव, अतिक्रमण मुकादम किरण मोरे, अनिल जाधव तसेच नगरपालिकेचे अनेक कर्मचारी सहभागी झाले होते. कारवाई सुरळीत पार पडावी यासाठी कर्मचाऱ्यांनी परिसरात सतर्कता ठेवली.
नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिक व व्यावसायिकांना सार्वजनिक रस्ते व फूटपाथवर अतिक्रमण न करण्याचे आवाहन केले आहे. शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर अशा प्रकारची कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. नगरपालिकेच्या या कारवाईमुळे चौक परिसरातील रस्ते मोकळे झाल्याने वाहतुकीला काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या