Friday, March 13, 2026
Homeजळगावभुसावळमध्ये गॅस एजन्सींची प्रशासनाकडून पाहणी; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – पुरवठा...

भुसावळमध्ये गॅस एजन्सींची प्रशासनाकडून पाहणी; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – पुरवठा विभागाचे आवाहन

भुसावळमध्ये गॅस एजन्सींची प्रशासनाकडून पाहणी; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – पुरवठा विभागाचे आवाहन
भुसावळ :   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        सध्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गॅस, पेट्रोल व डिझेल यांसारख्या जीवनावश्यक इंधनांच्या उपलब्धतेबाबत नागरिकांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, तसेच पुरवठा व्यवस्था सुरळीत राहावी या उद्देशाने प्रशासनाने खबरदारीची पावले उचलली आहेत. मा. तहसीलदार भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाच्या पथकाने आज भुसावळ शहरातील विविध गॅस एजन्सींना भेटी देऊन साठा व वितरण व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली.

 


जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार सध्या जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याचा दररोज आढावा घेतला जात आहे. नागरिकांना गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत आणि नियमितपणे उपलब्ध राहावा, तसेच कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन विशेष लक्ष ठेवून आहे. याच अनुषंगाने भुसावळ तालुक्यातील विविध गॅस एजन्सींमध्ये प्रत्यक्ष जाऊन उपलब्ध साठा, वितरण प्रक्रिया, ग्राहकांना होणारी सेवा आणि पुरवठ्याची नियमितता याची सविस्तर तपासणी करण्यात आली.
या पाहणीदरम्यान भुसावळ येथील अमित गॅस एजन्सी, मदन राजाराम बोरकर गॅस एजन्सी, वर्षा गॅस एजन्सी, धनश्री गॅस एजन्सी तसेच भुसावळ रेल्वे सोसायटी संचालित गॅस एजन्सी येथे भेट देऊन अधिकाऱ्यांनी साठ्याची स्थिती तपासली. एजन्सींमध्ये उपलब्ध गॅस सिलेंडर्सचा साठा, वितरणासाठी असलेली व्यवस्था, ग्राहकांची नोंदवही, वितरणाचे वेळापत्रक तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची सखोल पाहणी करण्यात आली.

 

Oplus_131072

पाहणीदरम्यान पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती रोषणा रेवतकर यांनी एजन्सी चालकांशी संवाद साधून सध्याच्या साठ्याची माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यांनी सांगितले की, राज्यभरात गॅस सिलेंडर्सचा पुरवठा सुरळीत सुरू असून कोणतीही टंचाई नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
नागरिकांनी गरजेपुरतेच गॅस सिलेंडर घ्यावेत व अनावश्यक साठा करून इतरांना अडचण निर्माण होईल असे वर्तन करू नये, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. काही ठिकाणी अफवांमुळे नागरिकांकडून अनावश्यक साठा करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले असून अशा प्रकारांवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.
तसेच गॅस एजन्सींना देखील नियमितपणे वितरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्राहकांना वेळेवर गॅस सिलेंडर मिळावा, वितरण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी आणि कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.

 

Oplus_131072

दरम्यान, प्रशासनाकडून इंधन पुरवठ्याचा दैनिक आढावा घेतला जात असून भुसावळ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसून शांतता व संयम राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या पाहणी मोहिमेदरम्यान पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती रोषणा रेवतकर यांच्यासह पुरवठा विभागातील संबंधित कर्मचारी उपस्थित होते. प्रशासनाकडून आगामी काळातही अशाच प्रकारे वेळोवेळी तपासण्या करून पुरवठा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या