भुसावळात हॉटेल व्यावसायीकाला मारहाण करून लुटले ; एकास अटक
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – भुसावळ येथील हॉटेल व्यावसायीकाला रस्त्यात अडवून त्यास मारहाण करीत त्याच्याकडील मोबाईल लांबवण्यात आला होता. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होताच 24 तासांच्या आत तपास चक्र फिरवुन रेकॉर्डवरील आरोपी रितीक दशरथ तायडे (22, पंचशील नगर, भुसावळ) यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरी केलेला मोबाईल व दुचाकी जप्त करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की तक्रारदार रवींद्र सुरेश जगताप (45, रा. देना नगर, भुसावळ) हे आपला हॉटेलचा व्यवसाय आटोपून गुरुवार, 12 मार्च रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीने घरी जात असताना जामनेर रोडवरील भिरुड हॉस्पिटलमार्गे शिकलकर वाड्याजवळ एका अज्ञात तरुणाने त्याची दुचाकी अडविली.रवींद्र जगताप यांनी गाडी का आडवी लावली? असे विचारले असता आरोपीने त्यांना शिविगाळ करत धमकावले. अनोळखी संशयित
आरोपीने जगताप यांच्याकडे असलेल्या पैशांची मागणी केली. माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितल्याचा राग मनात धरून आरोपीने जगताप यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर त्यांच्या खिशात असलेला साधारण 14 हजार रुपये किंमतीचा महागडा मोबाईल जबरीने हिसकावून चोरून नेला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आरोपीस लाल जैन मंदिराजवळून अटक करण्यात आली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तसेच मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक केदार बारबोले, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर, कॉन्स्टेबल जावेद शहा, चंद्रकांत रायपूरकर, सचिन चौधरी, दिलीप कोल्हे, महेंद्र पाटील, अक्षय कोतकर, भीमराव जगताप आदींनी केली आहे .

