रावेर येथील विशाल अग्रवाल यांना ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ कृषी पुरस्काराने सन्मानित
रावेर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रावेर शहरातील युवा उद्योजक विशाल अग्रवाल यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कृषी क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबई येथे आयोजित भव्य सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रसिद्ध अभिनेते आमिर खान, अभिनेते विकी कौशल तसेच आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
रावेर शहरातील रहिवासी असलेले विशाल अग्रवाल यांनी शेतीत हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार केळी उत्पादनात उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांच्या शेतातील केळीचे उत्पादन देशांतर्गत बाजारपेठेसोबतच आखाती देशांमध्येही निर्यात केले जाते. त्यामुळे रावेर परिसरातील केळी उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्यास मदत झाली आहे.
याशिवाय त्यांनी नुकतीच कृषी क्षेत्राशी संबंधित एक कंपनी स्थापन केली असून त्याद्वारे रावेर परिसरातील अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आधुनिक शेती पद्धती आणि निर्यातक्षम उत्पादनामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना कृषी श्रेणीतील ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला विशाल अग्रवाल यांच्यासह रश्मी अग्रवाल, वरुण अग्रवाल आणि संपूर्ण अग्रवाल परिवार उपस्थित होता. दरम्यान, हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नगराध्यक्ष संगिता महाजन, कृषीतज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील, डॉ. सुरेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी विशाल अग्रवाल यांचे अभिनंदन केले आहे.

