Sunday, March 15, 2026
Homeगुन्हामहिलेच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून सोन्याची पोत हिसकावली भामट्याचा पळ !

महिलेच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून सोन्याची पोत हिसकावली भामट्याचा पळ !

महिलेच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून सोन्याची पोत हिसकावली भामट्याचा पळ !

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील मालेगाव रोडवरील राखुंडेनगर परिसरात दुचाकीवरून आलेल्या भामट्याने महिलेच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

राखुंडेनगर परिसरातील एक महिला शुक्रवार (दि.१३) रोजी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास घरातील खरकटे पाणी बाहेर फेकण्यासाठी घराबाहेर गेल्या होत्या. पाणी फेकून त्या पुन्हा घराकडे परतत असताना अचानक दुचाकीवरून एक अज्ञात व्यक्ती वेगाने आली. काही समजण्याआधीच त्या भामट्याने महिलेच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली व गळ्यावर झडप घालत गळ्यातील सुमारे १ लाख २० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून दुचाकीवरून मालेगावच्या दिशेने पळ काढला.महिलेने आरडाओरड केल्यानंतर त्यांच्या सासऱ्यांसह पती व परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०४ (२) अन्वये चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, शहरात दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. तसेच स्वतःला पोलीस किंवा सरकारी कर्मचारी असल्याचे सांगून वृद्धांच्या अंगावरील दागिने काढून घेण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. आता महिलेच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून सोन्याची पोत लुटल्याच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भामट्यांचा तातडीने शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या