चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून नायगावची महिला बेपत्ता
चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – यवतमाळ जिल्ह्यातील नायगाव येथील एक महिला चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, तानबा नामदास (रा. नायगाव, ता. बाभुळगाव, जि. यवतमाळ) हे आपल्या पत्नी सविता लाला नामदास यांच्यासह चाळीसगाव येथील हजरत पिर मुसा कादरी बाबा दर्ग्यावर दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपल्यानंतर १० मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता ते दोघे आपल्या गावी जाण्यासाठी चाळीसगाव रेल्वे स्थानकावर आले. धामणगावकडे जाणारी विदर्भ एक्सप्रेस रात्री १२.३० वाजता असल्याने ते दोघे बुकिंग कार्यालयाजवळ थांबले होते.दरम्यान, रात्री सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास सविता नामदास या बाथरूमला जाऊन येते असे सांगून गेल्या. मात्र १० ते १५ मिनिटे होऊनही त्या परत न आल्याने पती तानबा नामदास यांनी बाथरूम परिसरात शोध घेतला. तसेच स्थानक परिसरातही चौकशी केली; मात्र त्या आढळून आल्या नाहीत.याप्रकरणी तानबा नामदास यांनी शुक्रवार (दि.१३) रोजी चाळीसगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी हरवल्याची नोंद केली आहे.
बेपत्ता महिलेचे वर्णन असे : रंग काळा सावळा, उंची सुमारे पाच फूट, बांधा मध्यम जाड, केस काळे, अंगात आकाशी रंगाची साडी व गोल्डन रंगाचा ब्लाऊज. डाव्या हातावर ‘तुकाराम’ असे नाव गोंदलेले आहे.
या महिलेबाबत कोणाला माहिती मिळाल्यास चाळीसगाव लोहमार्ग पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तपासी अंमलदार हवालदार पंकज पाटील यांनी केले आहे.

