तालुक्यात बोगस शालार्थ आयडी प्रकरण उघड ! अनेक शाळांतील शिक्षकांचा समावेश

<img class

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – राज्यभर गाजत असलेल्या बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची व्याप्ती आता चाळीसगाव तालुक्यातही उघड होत असून राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाळांतील काही शिक्षकांच्या नावांचा या प्रकरणात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक, मालेगाव व नंदुरबार जिल्ह्यांमध्ये शालार्थ आयडी संदर्भातील बनावट प्रकरणे उघडकीस आली असून याप्रकरणी विदर्भातही काही वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नाशिक विभागातील तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, नितीन बच्छाव आणि डॉ. बी. बी. चव्हाण यांच्यासह काही शिक्षणाधिकारी व वेतन विभागातील कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असून डॉ. चव्हाण सध्या फरार असल्याची माहिती आहे.जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक बोगस प्रकरणे आढळून आली असून त्यामध्ये जामनेर, शेंदुर्णी, एरंडोल, पाचोरा, पारोळा, भुसावळ आणि चाळीसगाव या तालुक्यांचा समावेश आहे. चाळीसगाव तालुक्यातील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पोहोरे, चाळीसगाव, वाडे व गणेशपूर येथील माध्यमिक विद्यालयांमध्ये शालार्थ आयडी बनावट असल्याची प्रकरणे समोर आली आहेत.पोहोरे येथील माध्यमिक विद्यालयातील अनिल निंबा वाघ, अविनाश शामराव देवरे, गायत्री ज्ञानदेव मोरे, मंगेश किशोर शितोळे , रोहित राजेंद्र राजपूत, सोमनाथ रामचंद्र खैरनार तसेच चाळीसगाव येथील राष्ट्रीय विद्यालयातील हर्षल अरुणराव देशमुख यांच्या शालार्थ आयडी संदर्भातील प्रकरणांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.याशिवाय, कादरिया एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी संचलित नॅशनल उर्दु हायस्कूल, चाळीसगाव येथील अझरुद्दीन खैरुद्दीन सैय्यद, शेख आफताब अहमद, शेख सलीम, शेख अब्दुल रऊफ, शाहीनबी शेख समीर यांच्याही शालार्थ आयडी बनावट असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
बेलगंगा ग्रामीण विकास प्रतिष्ठाण संचलित बेलगंगा टेक्निकल माध्यमिक विद्यालय (बेलगंगानगर), बोरखेडा बु., पिंप्री बु., वाघडू, वडाळा-वडाळी, तसेच मांदुर्णे येथील उच्च माध्यमिक विद्यालयांतील काही शिक्षकांचीही नावे या प्रकरणात समोर आली असून संबंधितांविरोधात पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.
या गंभीर प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाकडून सखोल चौकशी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील भडगाव, पाचोरा व चाळीसगाव तालुक्यातील इतर शिक्षण संस्थांची माहिती उपलब्ध होताच ती टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

