शहरात ‘तिसऱ्या डोळ्याचा’ अभाव; चोरट्यांना मोकळे रान
चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि वाढती वाहतूक यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर ताण वाढत असताना, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या अभावामुळे चोरटे व गुन्हेगारांना मोकळे रान मिळत असल्याचे चित्र समोर येत आहे.
शहरात विविध भागांत चोरी, लूटमार व इतर गैरप्रकारांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलीस यंत्रणा प्रयत्नशील असली तरी मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. याचाच फायदा गुन्हेगारांकडून घेतला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.दरम्यान, शहराला ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने नेण्याचा संकल्प नगरपरिषदेने केला असून येत्या काळात शहरभर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्याचे संकेत देण्यात आले आहेत. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पातही या योजनेचा उल्लेख करण्यात आला आहे.तज्ज्ञांच्या मते, केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता नागरिकांनीही स्वतःच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. घर, दुकान, कार्यालय तसेच सोसायटी परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविल्यास गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकते.
कमी खर्चात उपलब्ध असलेल्या आधुनिक कॅमेऱ्यांमुळे नागरिकांना स्वतःची सुरक्षा अधिक प्रभावीपणे करता येणे शक्य आहे. ‘आपली सुरक्षा आपल्या हाती’ या दृष्टीकोनातून नागरिकांनी सजग राहून सहकार्य केल्यास पोलीस तपासालाही मदत होऊन गुन्हेगारीवर आळा बसू शकतो.

