शिवशाही बसची धडक; महिलेचा पाय चाकाखाली, गंभीर जखमी
चाळीसगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवशाही बसच्या धडकेत एका महिलेचा पाय चाकाखाली आल्याने ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमी महिलेला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शिवशाही बस सेवा ही बस छत्रपती संभाजीनगरकडून चाळीसगाव बस स्थानकाकडे येत असताना मुख्य चौकातील सर्कलवर वळण घेताना हा अपघात झाला. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या घटनेची नोंद अद्याप चाळीसगाव पोलीस ठाण्यात झालेली नसल्याचे समजते.
🚦 सिग्नल यंत्रणा बंद; अपघातांना आमंत्रण
छत्रपती शिवाजी महाराज चौक हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा चौक असून, चारही दिशांना वाहतूक याच ठिकाणावरून होते. वाढती रहदारी लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी नगरपालिकेने येथे सिग्नल यंत्रणा बसविली होती. मात्र, लाखो रुपये खर्चून उभारलेली ही यंत्रणा काही काळानंतर बंद पडली आणि आजही निष्क्रिय अवस्थेत आहे.
याबाबत छत्रपती संभाजी सेना सह विविध संघटनांनी वारंवार मागणी करूनही सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी चौकात वाहतूक अनियंत्रित राहून अपघातांची शक्यता वाढत आहे.स्थानिक नागरिकांकडून नगरपालिकेने तातडीने सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी जोर धरत आहे.

