फेसबुक पोस्ट मुळे जातीय तेढ . गुन्हा दाखल -चाळीसगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नगरसेवक रामचंद्र यशवंत जाधव (वय 53, रा. नवागांव, चाळीसगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, 14 मार्च रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास ‘हक्क मागतोय चाळीसगाव’ या फेसबुक पेजवर जाधव व आमदार मंगेश चव्हाण यांचा एकत्र जेवण करतानाचा फोटो व्हायरल करण्यात आला. या फोटोसोबत “हा जेवणातील भेदाभेद का? अजून भेदाभेद संपला नाही वाटतंय?” असा मजकूर टाकण्यात आला होता. फिर्यादीच्या मते, संबंधित पोस्टमधील मजकूर खोटा व दिशाभूल करणारा असून, कोणताही जातीय भेदभाव प्रत्यक्षात घडलेला नसताना तसे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आले असा आरोप आहे . . यामुळे दोन समाज व धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊन सामाजिक बांधिलकी ला बाधा येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.तसेच, या प्रकारामुळे स्वतःला व कुटुंबियांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी ‘हक्क मागतोय चाळीसगाव’ हे फेसबुक पेज चालविणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन स्टाफ करत आहेत.


