भुसावळात सफाई कामगाराला कामावरून काढण्याची धमकी : माजी नगरसेवक विरोधात गुन्हा दाखल!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – भुसावळ येथे सफाई कामगार वॉर्डात कामासाठी न आल्याने शिविगाळ करीत त्यास कामावरून काढण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना शहरात सोमवारी घडली. या प्रकरणी सफाई कर्मचारी मदन किसन पतरोडिया (46, पंचशील नगर, बौद्ध विहारामागे, भुसावळ) यांच्या तक्रारीवरून माजी नगरसेवक समीर कृष्णधन कर उर्फ धोनी (भुसावळ) विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत मदन पतरोडिया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवार, 23 रोजी सकाळी 5.40 वाजता ते शिवाजीनगरात कामगार राजन जेथे व सुनील चेंगट यांच्यासह काम करीत असताना यावेळी समीर कृष्णधनकर हे साडेसात वाजेच्या सुमारास आले व त्यांनी आमच्या वॉर्डात काम करायला सांगितल्यानंतरही येथे का आले म्हणून आमच्या वॉर्डात काम कर, असे बजावले. आपण त्यांना येथील काम आटोपल्यानंतर कामासाठी येतो, असे सांगितल्याने धोनी आपल्या अंगावर धावून आले त्यांनी तुम्ही फुकटचा पगार घेतात, काहीच काम करत नाही, असे म्हटल्याने आपण त्यांना पोलिसात तक्रार करू, असे सांगितल्याने त्यांनी शिविगाळ करून आपली बहिण नगरसेविका असल्याने मुकादमी काढून टाकण्याची धमकी देत शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. पोलिसांनी धोनी यांना नोटीस बजावल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले असून सफाई कामगारावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करीत कायदेशीवर कारवाईची मागणी केली तसेच कामबंद आंदोलन करण्याचा इशाराही दिला.

