Wednesday, March 25, 2026
Homeगुन्हालग्नावरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात पिंप्राळ्याचे पती-पत्नी ठार

लग्नावरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात पिंप्राळ्याचे पती-पत्नी ठार

लग्नावरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात पिंप्राळ्याचे पती-पत्नी ठार

जळगाव  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            तालुक्यातील उमाळा-गाडेगाव दरम्यान बुधवारी दुपारच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. आपल्या चुलत भावाच्या मुलीचे लग्न आटोपून दुचाकीने घरी परतणाऱ्या पती-पत्नीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात जळगावच्या पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी असलेल्या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको भागातील मुझफ्फर अली सैय्यद बबन (वय ६०) आणि त्यांच्या पत्नी ताहेराबी मुजफ्फर अली (वय ५५) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. मुझफ्फर अली हे मसाला विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. बुधवारी २५ मार्च रोजी त्यांच्या चुलत भावाच्या मुलीचे फर्दापूर येथे लग्न होते. लग्नासाठी हे दाम्पत्य आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच १९ ईजे ३८९८) गेले होते.

 

परतीच्या प्रवासात काळाचा घाला :
लग्नाचा सोहळा आनंदाने पार पाडल्यानंतर दुपारी ४ वाजेच्या सुमारास हे दाम्पत्य जळगावच्या दिशेने परतत होते. उमाळा ते गाडेगाव दरम्यान असलेल्या पुलाजवळ एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भीषण धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दोघेही पुलाच्या खाली फेकले गेले आणि त्यात गंभीर जखमी झाले.

रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली :
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने एका खाजगी वाहनातून दोघांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती दोघांनाही ‘मयत’ घोषित केले. ही बातमी समजताच शासकीय रुग्णालयात नातेवाईक आणि मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. ऐन आनंदाच्या वातावरणात ही घटना घडल्याने सैय्यद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी अद्याप पोलीस दप्तरी अधिकृत नोंद झालेली नसली तरी, अज्ञात वाहनधारकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या