मुक्ताईनगरच्या गौरव भंडारे यांची GATE परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी
मुक्ताईनगर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथील गौरव गोपाल भंडारे यांनी राष्ट्रीय स्तरावरील GATE (Graduate Aptitude Test for Engineering) – Biotechnology परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत अखिल भारतीय स्तरावर 4053 वा क्रमांक पटकावला आहे. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे.
गौरव यांचे वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून, मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले आहेत. आईनेही वडिलांना खांद्याला खांदा लावून साथ दिली. अशा बिकट परिस्थितीतही गौरव यांनी हार न मानता सातत्याने अभ्यास करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांच्या पालकांच्या कष्टाचे चीज झाले आहे.
सध्या गौरव हे शिरपूर येथील एच. आर. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे बी. फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहेत. GATE परीक्षेतील यशामुळे त्यांच्यासाठी देशातील नामांकित IIT आणि NIT संस्थांमध्ये M.Tech शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.
गौरव यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबियांचा मोठा वाटा असून, नर्सरीपासून बारावीपर्यंत श्री. मासुळे सर यांचे मार्गदर्शन तसेच सध्याच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांचे सहकार्य लाभले आहे.
गौरव यांच्या या यशामुळे मुक्ताईनगर परिसरात अभिमान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असून, अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.


