भुसावळमध्ये रंगणार कबड्डीचा महाकुंभ; चार दिवस थरारक सामन्यांची मेजवानी
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरणाऱ्या भुसावळ कबड्डी प्रीमियर लीग पर्व-2 चे आयोजन 1 ते 4 जून दरम्यान करण्यात आले आहे. चार दिवस चालणाऱ्या या भव्य स्पर्धेमुळे शहरात कबड्डीचा उत्साह शिगेला पोहोचला असून क्रीडारसिकांना दर्जेदार आणि रोमांचक सामन्यांची मेजवानी मिळणार आहे.
विविध संघांचा सहभाग; खेळाडूंच्या कौशल्याची होणार चुरस !
स्पर्धेतील सामने दररोज सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत रंगणार असून विविध संघांतील खेळाडू आपल्या कौशल्याचे दर्शन घडविणार आहेत. चुरशीच्या लढतींमुळे प्रेक्षकांना उच्च दर्जाच्या कबड्डीचा आनंद अनुभवता येणार आहे.या स्पर्धेमुळे शहरातील क्रीडा संस्कृतीला बळ मिळणार असून युवा खेळाडूंना स्वतःची प्रतिभा सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री बलभद्र क्रीडा मंडळ आणि श्री फाउंडेशन यांच्याकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत रंगणार सामने
आयोजन समितीचे अध्यक्ष मुकुंद शिंदे उपाध्यक्ष रोहन बरडे व रोहित श्रीवास्तव यांच्यासह सागर शिंदे, अक्षय शिंदे, पियुष शर्मा, सार्थक बोके आणि प्रथमेश नाले हे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.आयोजकांनी भुसावळ व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.