गिरणा नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन; प्रशासनावर दुर्लक्षाचे आरोप
चाळीसगाव, –खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी तालुक्यातील रहिपुरी व जामदा परिसरातील गिरणा नदीपात्रातून गेल्या महिनाभरापासून दिवसरात्र जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याचे समोर आले आहे. उत्खनन केलेली वाळू डंपरद्वारे चाळीसगाव-मालेगाव तसेच नाशिककडे विक्रीसाठी पाठवली जात असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.जिल्ह्यात इतरत्र वाळू तस्करांविरुद्ध कारवाई होत असताना चाळीसगाव तालुक्यात मात्र किरकोळ प्रकरणांवरच कारवाई होत असून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही वाळू तस्करांना पाठबळ असल्यामुळे स्थानिक प्रशासन कठोर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे.मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक वाळू चोरी होत असल्याचे दिसून येत आहे. रहिपुरी, जामदा, बहाळ, उपखेड, दसेगाव या गावांजवळील गिरणा नदीपात्रात सातत्याने उत्खनन सुरू असल्याचे सांगितले जाते. तसेच भडगाव येथून दररोज रात्री उशिरा वाळूने भरलेले डंपर चाळीसगाव शहरात येऊन थांबत असून, एजंटमार्फत सकाळपर्यंत त्याची विक्री व विल्हेवाट लावली जाते.दरम्यान, या प्रकारामुळे पर्यावरणीय हानीसह शासनाच्या महसुलालाही मोठा फटका बसत असल्याने संबंधित यंत्रणांनी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


