चाळीसगावात नाकाबंदीदरम्यान ३५ वाहनांवर कारवाई; ४८ हजारांचा दंड वसूल !

<img class

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी नाकाबंदीदरम्यान विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३५ वाहनधारकांवर कारवाई करत सुमारे ४८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल पाटील, एएसआय युवराज नाईक यांच्यासह पोलीस कर्मचारी बाळू बविस्कर, ओंकार सुतार, रविंद्र रावते, विजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. सोमवारी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेदरम्यान विराम गार्डन परिसर व धुळे बायपास येथे नाकाबंदी लावून तपासणी करण्यात आली.
या मोहिमेत विना परवाना वाहन चालवणे, सीट बेल्टचा वापर न करणे, वाहनांवर नंबर प्लेट नसणे तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावणे अशा उल्लंघनांवर कारवाई करण्यात आली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली. अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालवण्याचे प्रकार वाढत असल्याचेही समोर आले आहे. १८ वर्षांखालील मुलांनी वाहन चालवणे हे नियमभंग असून अशा प्रकरणात पालकांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिला आहे.

