कुस्ती परंपरेचा वारसा जपणाऱ्या दोन पिढ्यांचा संगम चाळीसगावचे पहेलवान विजय चौधरींकडून हर्षवर्धन सदगीरचे अभिनंदन
चाळीसगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी महाराष्ट्राच्या समृद्ध कुस्ती परंपरेचा वारसा जपणाऱ्या दोन पिढ्यांचा भावनिक संगम नुकताच नवी मुंबईत पाहायला मिळाला. सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले माजी महाराष्ट्र केसरी विजेते तालुक्यातील विजय चौधरी यांनी दोन वेळा महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारे युवा पैलवान हर्षवर्धन सदगीर यांचे अभिनंदन केले.कुस्तीच्या आखाड्यात घाम गाळून नाव कमावलेल्या या दोन्ही दिग्गजांची ही भेट केवळ औपचारिक न राहता परंपरा, संस्कार आणि क्रीडाप्रेम यांचा संगम ठरली. विजय चौधरी यांनी २०१४, २०१५ आणि २०१६ या सलग तीन वर्षांत महाराष्ट्र केसरी किताब जिंकून राज्याच्या कुस्तीविश्वात वर्चस्व गाजवले होते. कठोर साधना, आत्मशिस्त आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी मैदान गाजवल्यानंतर पोलिस सेवेत प्रवेश करून जबाबदारीचेही उत्तम उदाहरण घालून दिले.
दुसरीकडे, हर्षवर्धन सदगीर यांनी दोन वेळा महाराष्ट्र केसरी किताब मिळवत नव्या पिढीतील दमदार उपस्थिती सिद्ध केली आहे. या भेटीत दोघांमध्ये कुस्ती परंपरा, प्रशिक्षण आणि भविष्यातील संधी यावर चर्चा झाली.
“परंपरेचा सन्मान राखत पुढे जायचे असेल, तर मेहनतीला पर्याय नाही. मातीशी नाळ जोडून घडणारे खेळाडूच समाजासाठी प्रेरणादायी ठरतात,” असे मत नवी मुंबई कुस्ती संकुलाचे प्रमुख प्रशिक्षक संपत्ती येळकर यांनी व्यक्त केले.


