वाघळी येथे घरफोडी; दागिने व रोख रक्कम लंपास
चाळीसगाव ( खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी : तालुक्यातील वाघळी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दागिने व रोख रक्कम असा सुमारे ८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमोल बालू खैरे (वय २६, रा. वाघळी) हे आपल्या कुटुंबासह राहतात. २५ मार्च रोजी सायंकाळी ते शेतातील कामासाठी कुटुंबासह घराला कुलूप लावून गेले होते. दरम्यान, २६ मार्च रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता त्यांच्या काकांनी फोन करून घराचे दरवाजे उघडे असल्याची माहिती दिली.
यानंतर अमोल खैरे यांनी घरी येऊन पाहणी केली असता वरच्या व खालच्या मजल्यावरील दरवाजांचे कोयंडे तोडलेले आढळले. घरातील लोखंडी कपाट उघडून सामान अस्ताव्यस्त करण्यात आले होते. तपासणीअंती कपाटातून चांदीचे दागिने व सुमारे ५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ८ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
ही घटना २५ मार्च रात्री १० ते २६ मार्च पहाटे २.३० दरम्यान घडली असल्याचा अंदाज असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.


