नववीत शिकणार्या विद्यार्थ्याला तिघांकडून मारहाण ; पाठीत चॅापरने वार !

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – चाळीसगाव येथील अभिनव शाळेत इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेणार्या 16 वर्षीय मुलाला मागील भांडणाच्या कारणातून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी लाकडी दांडक्यांनी जबर मारहाण करून तसेच पाठीत चॅापरने वार करून जखमी केल्याची घटना शाळेच्या गेटसमोर घडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, तिघांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईशान योगेश महाले (16) रा. स्वयंवर मंगल कार्यालय पाठीमागे, टाकळी प्र.चा. याचा सोमवार 30 रोजी सकाळी अभिनव शाळेत पेपर होता. पेपर संपल्यावर तो शाळेच्या गेटसमोर रस्त्यावर उभा असतांना खरजई नाकाकडून दुचाकीवर ज्ञानदीप चौधरी, रोहीत चौधरी व तन्मय मोरे हे तिघेजण आले व ईशान जवळ दुचाकी थांबवून तिघांनी शिवीगाळ केली. यावेळी रोहीत याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने ईशान यास मारहाण केली. तर तन्मय मोरे याने त्याच्या हातातील चॉपरने पाठीच्या डाव्या बाजूस वार करून दुखापत केली.

यावेळी हायस्कूलच्या गेटवर असलेल्या वॉचमनसह ईशानचा मित्र यांनी तिघांच्या तावडीतून इशानला सोडवले व तिघे दुचाकीवरून बसून पळून गेले. मागील सहा महिन्यापूर्वी तन्मय मोरे व रोहीत चौधरी यांनी ईशानला मारहाण केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या रागातून तिघांनी पुन्हा आपणास मारहाण केल्याचे ईशान महाले याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी ईशान महाले याच्या फिर्यादीवरून ज्ञानदीप चौधरी, रोहीत चौधरी व तन्मय मोरे या तिघांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम 118(1),352,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

