Thursday, April 2, 2026
Homeकृषीमहावितरणचा निष्काळजीपणा जीवावर! भोरटेक येथे वीज प्रवाहाने ५ शेळ्या ठार; २ लाखांचे...

महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर! भोरटेक येथे वीज प्रवाहाने ५ शेळ्या ठार; २ लाखांचे नुकसान

महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर! भोरटेक येथे वीज प्रवाहाने ५ शेळ्या ठार; २ लाखांचे नुकसान

वारंवार तक्रार करूनही वाकलेला पोल हटवला नाही; पाडळसेच्या सहाय्यक अभियंत्यांची उद्धट उत्तरे, आमदार अमोल जावळेंचा हस्तक्षेप

भुसावळ     खानदेश  लाईव्ह न्युज प्रतिनिधी             दि 2
भोरटेक (ता. यावल) येथील शेळीपालक अनिल अर्जुन कोळी यांच्या गोठ्यात महावितरणच्या झुकलेल्या पोलमुळे वीज प्रवाह उतरून ५ शेळ्या जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना २ एप्रिल रोजी सकाळी घडली. या दुर्घटनेत कोळी यांचे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, अवघ्या १५ मिनिटांच्या फरकाने त्यांचा भाचा थोडक्यात बचावला आहे. विशेष म्हणजे, संबंधित पोल हटवण्यासाठी वर्षभरापासून मागणी करूनही महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही जीवितहानी ओढवली आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक १ एप्रिल रोजी रात्री पाडळसे-भोरटेक शिवारात वादळी पाऊस झाला. या वादळात अनिल कोळी यांच्या घराशेजारील महावितरणचा वीज पोल वाकून गोठ्याच्या पत्र्यावर झुकला. ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही. गुरुवारी (दि. २) सकाळी ७:४५ वाजता कोळी यांचा भाचा पप्पू कोळी याने शेळ्यांचे दूध काढले आणि तो गोठ्याबाहेर पडला. त्यानंतर बरोबर ८ वाजता महावितरणकडून वीज पुरवठा सुरू करण्यात आला. वीज सुरू होताच पत्रात उतरलेल्या करंटमुळे गोठ्यातील ५ शेळ्या तडफडून जागीच ठार झाल्या. बाह्य स्त्रोत कर्मचारी निखिल पाटील यांनी तत्परतेने वीज पुरवठा खंडित केल्याने उर्वरित शेळ्यांचे प्राण वाचले.
अभियंत्यांचा निष्काळजीपणा आणि ‘सुट्टी’चे कारण
या घटनेबाबत पाडळसे वीज वितरणचे सहाय्यक अभियंता *्दीपक पाटील यांना माहिती देण्यासाठी फोन केला असता, त्यांनी सुरुवातीला दोनदा फोन उचलला नाही. तिसऱ्यांदा फोन उचलल्यावर “आज मला सुट्टी आहे, मी कधीतरी येऊन पाहीन” असे नकारात्मक उत्तर दिले. एकीकडे गरीब शेळीपालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असताना, जबाबदार अधिकाऱ्याची ही वागणूक संतापजनक ठरली. अखेर आमदार अमोल जावळे यांनी हस्तक्षेप केल्यावर हे महाशय उशिरा घटनास्थळी पोहोचले.
आमदार अमोल जावळे यांच्याकडून दखल
घटनेची माहिती मिळताच रावेर-यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल जावळे यांनी शेळीपालक अनिल कोळी यांच्याशी फोनवरून संपर्क साधून सांत्वन केले. तसेच सावदा येथील एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर यांना संपर्क करून तो धोकादायक पोल तात्काळ हटवण्याचे कडक आदेश दिले.

पंचनामा आणि मागणी
पाडळसे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत शेळ्यांची तपासणी केली. याप्रसंगी पोलीस पाटील सुरेश खैरनार, वरिष्ठ तंत्रज्ञ दिलीप सोनवणे, अतुल कोळी, बाह्य स्त्रोत कर्मचारी निखिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते भगवान कोळी, कैलास सपकाळे, नितीन सपकाळे उपस्थित होते. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे हे नुकसान झाले असल्याने, पीडित शेळीपालकाला तात्काळ २ लाख रुपयांची मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या