Wednesday, May 20, 2026
Homeगुन्हालिलावात गोंधळ! कुऱ्हा पानाचे येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसमोरच मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या

लिलावात गोंधळ! कुऱ्हा पानाचे येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसमोरच मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या

लिलावात गोंधळ! कुऱ्हा पानाचे येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसमोरच मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे गावात ग्रामपंचायतीच्या आठवडा बाजाराच्या वार्षिक लिलावावेळी मोठा गोंधळ उडाला असून, दारूच्या नशेत आलेल्या काही इसमांनी थेट लिलाव प्रक्रियेत हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांसमोरच मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ग्रामपंचायत अधिकारी राहुल अरुण चौधरी यांच्या आदेशानुसार १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत आवारात लिलाव प्रक्रिया सुरू होती. यावेळी प्रशासक दुर्गाबाई सुरेश शिंदे, सदस्य जीवन प्रल्हाद पाटील, दत्तू जानकीराम बाविस्कर आणि किशोर अरुण कोळी उपस्थित होते.
दरम्यान, सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास स्वानंद त्र्यंबक पालोदे, सागर रामचंद काकडे व एक अनोळखी इसम दारूच्या नशेत लिलावस्थळी दाखल झाले. “अतिक्रमण का काढले नाही?” असा सवाल करत त्यांनी लिलाव थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करत वातावरण तापवले.

प्रशासक दुर्गाबाई शिंदे व सदस्य जीवन पाटील यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त इसमांनी त्यांच्यावरच हल्ला चढवला. जीवन पाटील यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या हाताला दुखापत करण्यात आली. तसेच प्रशासकांचे पती सुरेश काशीनाथ शिंदे यांनाही मारहाण करून त्यांचे कपडे फाडण्यात आले. इतकेच नव्हे तर संबंधितांनी “जीवे मारण्याच्या” धमक्याही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकारामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात मोठा अडथळा निर्माण झाला असून, सार्वजनिक सुरक्षेलाही धोका निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या