तोतया पोलिसांचा धक्कादायक कारनामा ! शेतकऱ्याला अडवून ६० हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास

मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तालुक्यातील सालबर्डी गावाजवळ दोन तोतया पोलिसांनी ६९ वर्षीय शेतकऱ्याला अडवून त्याच्या हातातील सुमारे ६० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या लंपास केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली आहे.
वढवे येथील रहिवासी सुरेश रघुनाथ बोठे हे बाजार आटोपून दुचाकीने गावाकडे परतत असताना ‘एका हॉटेल’ परिसरात दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. संशयितांनी स्वतःला पोलिस असल्याचे सांगत चौकशीच्या बहाण्याने बोठे यांच्यावर दबाव टाकला.धाक दाखवत आरोपींनी त्यांच्या हातातील १० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या. यात एक ६ ग्रॅमची अंगठी तर दुसरी ४ ग्रॅम वजनाची पुष्पराज खडा असलेली अंगठी असल्याची माहिती समोर आली आहे.घटना लक्षात येताच सुरेश बोठे यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ. राजेश चव्हाण करत आहेत.

