फोटोग्राफरवर हल्ला प्रकरणी सहाजण ताब्यात ; चौघांना चार दिवसांची पोलिस कोठडी !

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – अंकलेश्वर-ब-हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर फोटोग्राफरला अडवून बेदम मारहाण करत कारची तोडफोड व महागडे कॅमेरे लांबवल्याच्या प्रकरणात यावल पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीनांसह सहाजणांना ताब्यात घेण्यात आले असून अटक करण्यात आलेल्या चौघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही घटना बुधवारी रात्री एचपी पेट्रोल पंपाजवळ घडली होती. अनिकेत नंदा जाधव (वय २१, रा. मिलिंद नगर, जामखेड) हा आपल्या कारने प्रवास करत असताना दुचाकीस कट लागल्याच्या कारणावरून काही युवकांसोबत त्याचा वाद झाला. वादाचे रूपांतर काही वेळातच हिंसक प्रकारात झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ ते २० जणांच्या जमावाने अनिकेत जाधव यांना अडवून मारहाण केली. तसेच त्यांच्या कारच्या काचा फोडून कारचे मोठे नुकसान केले. यावेळी कारमधील महागडे कॅमेरे व फोटोग्राफी साहित्यही लंपास करण्यात आले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.या प्रकरणी यावल पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत सैय्यद अलताफ, सैय्यद शहादत, शेख दानिश व शेख तन्वीर यांच्यासह दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलांना कायदेशीर प्रक्रियेनंतर पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.अटक करण्यात आलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

