रेल्वे पुलावर भीषण अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
चाळीसगाव –. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शहरातील रेल्वे पुलावर सोमवारी रात्री सुमारे ८.३० वाजेच्या सुमारास भीषण अपघात होऊन पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली.
या अपघातात अर्जुन अनिल नरवाडे यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची पत्नी पूनम अर्जुन नरवाडे या गंभीर जखमी झाल्या आहेत. दोघेही बाजार करून घरी परतत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात घडला.
नरवाडे दाम्पत्य हे मूळ जामनेर येथील रहिवासी असून कामानिमित्त चाळीसगावातील डेराबर्डी परिसरात वास्तव्यास होते.
अपघातावेळी तेथून जात असलेले चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन वाल्हे यांनी तत्काळ घटनास्थळी थांबून नागरिकांच्या मदतीने जखमींना अॅम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयात पाठवले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत.



