: रेल्वे ब्रिजवरील अपघातांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी; छत्रपती संभाजी सेनेचे निवेदन
चाळीसगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शहरातील धुळे–मालेगाव मार्गावरील रेल्वे ब्रिज हा अपघातांचा गंभीर केंद्रबिंदू बनला असून येथे वारंवार छोटे-मोठे अपघात घडत असल्याचा आरोप छत्रपती संभाजी सेनेने केला आहे. या ठिकाणी महिन्याला दोन ते तीन गंभीर अपघात होऊन जीवितहानी होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी सेनेच्या वतीने प्रशासनाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. ब्रिजवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी स्पीड ब्रेकर, रंबलर, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे तसेच रिफ्लेक्टर लावण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.जर पुढील तीन दिवसांत योग्य उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर संस्थेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.हे निवेदन चाळीसगाव नगरपरिषद मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच शहर वाहतूक शाखेला देण्यात आले आहे.संभाजी सेनेचे संस्थापक लक्ष्मण शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली आबासाहेब सौंदाणे, अविनाश काकडे, सचिन जाधव, दिवाकर महाले, अमित काळे, संजय रावते, प्रशांत अहिरे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
स्थानिक नागरिकांकडूनही या ब्रिजवरील अपघात टाळण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.


