Friday, April 10, 2026
Homeकृषीपोलीस बंदोबस्तात ज्वारी-मका हमीभाव नोंदणीला सुरुवात; शेतकऱ्यांची उसळलेली गर्दी

पोलीस बंदोबस्तात ज्वारी-मका हमीभाव नोंदणीला सुरुवात; शेतकऱ्यांची उसळलेली गर्दी

पोलीस बंदोबस्तात ज्वारी-मका हमीभाव नोंदणीला सुरुवात; शेतकऱ्यांची उसळलेली गर्दी

चाळीसगाव :  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            रब्बी हंगामातील ज्वारी व मकाच्या हमीभाव खरेदीसाठी राज्य सरकारने ऑनलाईन नोंदणी सुरू केल्याने चाळीसगावात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली. शेतकरी सहकारी संघात नोंदणीसाठी एकच गर्दी झाल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.राज्यात १ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत ज्वारी, मका व इतर भरड धान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. सरकारचे आदेश मिळताच तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी सहकारी संघात धाव घेतली. सोमवारी रात्रीपासूनच काही शेतकरी नोंदणीसाठी रांगेत थांबले होते.
मंगळवारी सकाळी गर्दीत मोठी वाढ झाली. मात्र नोंदणी प्रक्रियेला विलंब होत असल्याने शेतकरी आक्रमक झाले. “नोंदणी झालीच पाहिजे” अशा घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होऊन कामकाज ठप्प झाले.
परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गर्दीवर नियंत्रण मिळवले व शेतकऱ्यांना शिस्तबद्ध रांगा लावण्यात आल्या.
दरम्यान, वाढती गर्दी लक्षात घेता टोकन पद्धतीने नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन शशिकांत साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यांना टोकन देऊन टप्प्याटप्प्याने ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा यासाठी ज्वारीचा हमीभाव ३७०० रुपये प्रति क्विंटल तर मकाचा हमीभाव २४०० रुपये निश्चित केला आहे. प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया १ मे ते ३० जून दरम्यान राबविण्यात येणार आहे. सध्या खाजगी बाजारात कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा हमीभाव खरेदीकडे मोठा कल दिसून येत आहे.या नोंदणी प्रक्रियेसाठी सुमारे ५०० हून अधिक शेतकऱ्यांनी उपस्थिती लावल्याची माहिती समोर आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या