Thursday, October 29, 2026
Homeगुन्हा९८ सभासदांच्या नावाने बोगस कर्जप्रकरणे; दोन निलंबित कर्मचाऱ्यांसह सात जणांविरुद्ध गुन्हा

९८ सभासदांच्या नावाने बोगस कर्जप्रकरणे; दोन निलंबित कर्मचाऱ्यांसह सात जणांविरुद्ध गुन्हा

भुसावळ येथील शिक्षक पतपेढी अपहार प्रकरण

९८ सभासदांच्या नावाने बोगस कर्जप्रकरणे; दोन निलंबित कर्मचाऱ्यांसह सात जणांविरुद्ध गुन्हा

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
सभासदांच्या नावाने बनावट कर्जप्रकरणे तयार करून, त्यावर बोगस सह्या करत तब्बल १ कोटी ९३ लाख ८६ हजार २५० रुपयांची रक्कम परस्पर इतरांच्या बँक खात्यांत वळविल्याचा प्रकार भुसावळमध्ये उघडकीस आला आहे. प्राथमिक शिक्षकांची न्यूतन सहकारी पतपेढी मर्यादित या संस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी दोन निलंबित कर्मचाऱ्यांसह सात जणांविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ९८ सभासदांच्या नावाने बनावट कर्जप्रकरणे पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, १२ सप्टेंबर २०२३ ते ३ मे २०२५ या कालावधीत संस्थेत चिटणीस, हिशोबनीस व लिपिक पदांवर कार्यरत असलेले राजू लालू गायकवाड आणि अभिजीत दत्तात्रय तायडे यांनी संगनमताने हा प्रकार केल्याचा आरोप आहे. दोघेही सध्या संस्थेतून निलंबित आहेत. संस्थेच्या पदाचा व अधिकारांचा गैरवापर करून ९८ सभासदांच्या नावाने कथितरीत्या बनावट कर्जप्रकरणे तयार करण्यात आली. या कर्जप्रकरणांवर सभासदांच्या बनावट सह्या करून ती खरी असल्याचे भासविण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. कर्जाची रक्कम सभासदांऐवजी इतरांच्या खात्यांत कर्जप्रकरणांच्या माध्यमातून मिळालेली रक्कम संबंधित सभासदांच्या खात्यांमध्ये जमा करण्याऐवजी अन्य व्यक्तींच्या बँक
खात्यांमध्ये जमा करण्याऐवजी अन्य व्यक्तींच्या बँक खात्यांत वळविण्यात आल्याचा आरोप आहे. या व्यवहारांत पाच व्यक्तींच्या बँक खात्यांचा वापर झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात निलेश रविंद्र महाजन यांच्या खात्यावर ८९ लाख ९२ हजार रुपये व ६७ लाख ८५ हजार ६०० रुपये, कुणाल संजय महाजन यांच्या खात्यावर ५८ हजार ३०० रुपये, हर्षल सुनील गावंडे यांच्या खात्यावर १९ लाख ४२ हजार रुपये, रुपाली अभिजीत तायडे यांच्या खात्यावर ६ लाख ४५ हजार ६०० रुपये, तर हर्षल रविंद्र चौधरी यांच्या खात्यावर ४ लाख ३८ हजार ५० रुपये वळविल्याचे नमूद आहे. या व्यवहारांतून एकूण १ कोटी ९३ लाख ८६ हजार २५० रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल या प्रकरणी सतीश दत्तात्रय बनकर (रा. जानोरी, ता. दिंडोरी, जि. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजू लालू गायकवाड, अभिजीत दत्तात्रय तायडे, निलेश रविंद्र महाजन, कुणाल संजय महाजन, हर्षल सुनील गावंडे, रुपाली अभिजीत तायडे आणि हर्षल रविंद्र चौधरी या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक व विश्वासघाताच्या आरोपांप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, या आर्थिक गैरव्यवहारामागील नेमकी कार्यपद्धती, व्यवहारांची साखळी आणि संबंधितांची भूमिका यांचा तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या