Friday, April 17, 2026
Homeजळगावस्वच्छतेची बोंबाबोंब; तरीही एसटी तिकीटात २ रुपयांची दरवाढ !

स्वच्छतेची बोंबाबोंब; तरीही एसटी तिकीटात २ रुपयांची दरवाढ !

स्वच्छतेची बोंबाबोंब; तरीही एसटी तिकीटात २ रुपयांची दरवाढ !

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – राज्य परिवहन महामंडळाकडून येत्या १५ एप्रिलपासून प्रवाशांकडून ‘स्वच्छता कर’ आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्रत्येक तिकीटामागे २ रुपये जादा मोजावे लागणार आहेत. मात्र बसस्थानके, आगार आणि बसेसची सध्याची दयनीय स्वच्छता पाहता या निर्णयावर प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या निर्णयानुसार बसस्थानक, स्वच्छतागृहे आणि प्रतीक्षालय स्वच्छ ठेवण्यासाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने हा कर आकारला जाणार आहे. मात्र प्रत्यक्षात बसस्थानक परिसरात कचऱ्याचे ढिगारे, अस्वच्छ स्वच्छतागृहे आणि बसमधील अपुरी साफसफाई यामुळे ‘स्वच्छतेची बोंबाबोंब’ असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे.प्रवाशांचे म्हणणे आहे की, कर वसूल करण्यापूर्वी बसस्थानके आणि बसेस ‘चकाचक’ करणे आवश्यक आहे. बस प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वी बसेस आतून-बाहेरून स्वच्छ असाव्यात, चार्जिंग पॉईंटसह इतर सुविधा कार्यरत असाव्यात, असा नियम असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.दरम्यान, या स्वच्छता करातून काही प्रवाशांना सवलत देण्यात आली आहे. विद्यार्थी, अहिल्याबाई होळकर पासधारक, १४ एप्रिलपूर्वी तिकीट बुक करणारे प्रवासी तसेच मानव विकास योजनेतील विद्यार्थ्यांना या करातून सूट देण्यात आली आहे.

सध्या बसस्थानक व आगारांची स्वच्छता कंत्राटी कामगारांकडून केली जात असली तरी तक्रारींचे प्रमाण वाढल्याने स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे महामंडळाकडून सांगितले जात आहे. १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून मासिक, त्रैमासिक पासधारक आणि सर्वसामान्य प्रवाशांकडून हा कर आकारला जाणार आहे.मात्र, “स्वच्छता कर घेतला जाणार असेल तर प्रत्यक्षात स्वच्छतेत सुधारणा दिसली पाहिजे,” अशी मागणी प्रवाशांकडून होत असून, बसस्थानके आणि स्वच्छतागृहांतील कायमस्वरूपी दुर्गंधी व अस्वच्छता दूर होणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या