सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भुसावळात पोलिसांचा धडक ‘कोम्बिंग ऑपरेशन’; 14 सराईत गुन्हेगारांवर कारवाई, दोन फरार आरोपी जेरबंद
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भुसावळ उपविभागीय पोलिसांनी जोरदार ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवत गुन्हेगारी प्रवृत्तींवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. या विशेष मोहिमेत बाजारपेठ पोलिसांनी आर्म अॅक्ट व चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या तब्बल 14 सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली, तर दोन फरार आरोपींना अटक करून पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये समीर शहा जब्बार शहा उर्फ डमरू आणि केवल अनिल टाक (दोन्ही रा. भुसावळ) यांचा समावेश असून, हे दोघेही गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे होते. त्यांच्या अटकेमुळे काही प्रलंबित गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या मोहिमेदरम्यान तपासण्यात आलेल्या आरोपींपैकी रेकॉर्डवरील चार जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या धडक आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी हालचालींवर मोठा आळा बसणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांनी निर्धास्तपणे उत्सव साजरे करावेत, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले.ही कारवाई विभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक राहुल वाघ, सहायक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव यांनी मोहिमेचे नेतृत्व केले. यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, कांतीलाल केदारे, महेंद्र पाटील, हर्षल महाजन, जीवन काकडे, चंद्रकांत रायपूरकर, दिलीप कोल्हे, अक्षय कोतकर, अमर अढाळे, जावेद शहा, भूषण चौधरी, प्रशांत सोनार आदींच्या पथकाने सक्रिय सहभाग नोंदवला.
दरम्यान, पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यास मदत होणार असून, भविष्यातही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. नागरिकांनीही संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना तत्काळ माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.