बिबट्याचा थरार; आमदारांच्या पुढाकाराने वनविभागाची यशस्वी कारवाई
मुक्ताईनगर :खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शहरातील विश्रामगृह परिसरात बिबट्या आढळल्याने रविवारी मोठी खळबळ उडाली. एका शेतकऱ्याने बिबट्या दिसल्याची माहिती दिल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेले आमदार चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ पोलीस व वनविभागाशी संपर्क साधत यंत्रणा सतर्क केली.



माहिती मिळताच पोलीस, वनविभाग, नगरपालिका तसेच एसटी महामंडळाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पकडण्यासाठी सुमारे काही तास प्रयत्न सुरू होते. या दरम्यान नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
विशेष म्हणजे आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती हाताळली. ते बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत होते आणि नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करत होते. त्यांच्या पुढाकारामुळे सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधला गेला.

दीर्घ प्रयत्नांनंतर वनविभागाला बिबट्याला पकडण्यात यश आले. या घटनेमुळे मुक्ताईनगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, एकटे बाहेर न जाणे व बिबट्या दिसल्यास त्वरित प्रशासनाला कळवण्याचे निर्देश दिले आहेत.

