पोलीसांची जनजागृती मोहीम; ‘सतर्क नागरिक, सुरक्षित शहर’चा प्रभावी संदेश

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि 13
भुसावळ शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासोबतच नागरिकांमध्ये सुरक्षा व सतर्कतेची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने बाजारपेठ पोलीस स्टेशनतर्फे राबविण्यात आलेल्या विशेष जनजागृती अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात नागरिकांना दैनंदिन जीवनात घ्यावयाच्या आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजनांची सविस्तर व उपयुक्त माहिती देण्यात आली.
या अभियानाचे प्रमुख आकर्षण ठरले ते ‘सी.ई.आय.आर.’ (CEIR) पोर्टलबाबत करण्यात आलेले प्रात्यक्षिक व मार्गदर्शन. मोबाईल हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास या पोर्टलच्या माध्यमातून पोलीस विभाग तांत्रिक सहाय्याने शोध घेऊ शकतो, याची माहिती नागरिकांना देण्यात आली. या माहितीनंतर उपस्थित नागरिकांमध्ये समाधान व तंत्रज्ञानाविषयी विश्वास वाढल्याचे दिसून आले.
गर्दीच्या ठिकाणी वाढणाऱ्या चोरीच्या घटनांबाबतही नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. मोबाईल चोरी, सोन्याचे दागिने लंपास होणे तसेच खिसेकापूंच्या घटनांपासून बचावासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. “सतर्क रहा, सुरक्षित रहा” हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.
एनसीसी व बाजारपेठ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
या जनजागृती अभियानामुळे नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत जागरूकता वाढून पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

