Wednesday, May 6, 2026
Homeजळगावतहसील कार्यालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह

तहसील कार्यालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह

तहसील कार्यालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह

मुक्ताईनगर – खानदेश ला इंग्लिश प्रतिनिधी                 येथील तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कार्यालयीन वेळेत अधिकारी उपस्थित नसणे, केव्हाही ये-जा करणे, तसेच नागरिकांना योग्य माहिती न देणे यामुळे संताप व्यक्त होत आहे.

तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक यांच्या हालचालींची नोंद ठेवणारे रजिस्टर पाहण्यासाठी गेलेल्या नागरिकांना संबंधित रजिस्टर उपलब्ध करून देण्यात आले नाही. कर्मचाऱ्यांनी देखील रजिस्टर दाखवण्यास टाळाटाळ केली. अधिकाऱ्यांविषयी विचारणा केली असता “साहेब बाहेर गेले आहेत, येत आहेत” अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याची तक्रार आहे. हालचाल रजिस्टरमध्ये नोंद केली आहे का, असे विचारल्यास कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट उत्तर मिळत नाही, उलट भ्रमणध्वनीवरून गुपचूप माहिती देण्याचा प्रकार होत असल्याचेही समोर आले आहे.

 

तहसील कार्यालयात रेशन कार्ड, तसेच विविध दाखल्यांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे दाखल्यांवर सही मिळवण्यासाठी नागरिकांना अक्षरशः भटकंती करावी लागत आहे. काही वेळा अधिकारी गोडाऊनकडे असल्याचे सांगण्यात येते, त्यामुळे नागरिक भर उन्हात तिथे धाव घेतात; मात्र तिथेही अधिकारी अनुपस्थित आढळल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

या सर्व प्रकारामुळे “तुम भी खाओ, हमको भी खिलाओ” अशा भ्रष्ट प्रवृत्तीचा संशय व्यक्त केला जात असून तहसील कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या