पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, तब्बल साडेतीन लाखांचा दंड वसूल !

फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राईव्हसह विविध नियमभंगांवर पोलिसांचा बडगा
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या अनुषंगाने जळगाव पोलिसांनी गुरुवारी (दि. ८ मे) सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेदरम्यान विशेष नाकाबंदी मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली. या मोहिमेत एकूण ३११ प्रकरणे नोंदविण्यात आली असून तब्बल ३ लाख ५८ हजार २५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.मा. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. अपर पोलिस अधीक्षक, जळगाव तसेच चाळीसगाव परिक्षेत्रातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि विविध विभागीय शाखांच्या अधिकाऱ्यांना नाकाबंदीचे आदेश देण्यात आले होते.
या कारवाईत ३२ पोलिस अधिकारी आणि २२२ पोलिस अंमलदार सहभागी झाले होते. विविध ठिकाणी नाकाबंदी लावून वाहनांची तपासणी करण्यात आली.नाकाबंदी दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईत फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या ४४ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. तसेच नंबर प्लेट नसलेल्या ७८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या १०६ जणांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.
याशिवाय, विनालायसन्स वाहन चालविणाऱ्या १४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली, तर ९ वाहने जप्त करण्यात आली. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ८ वाहनचालकांविरोधात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत पोलिसांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आगामी काळातही अशाच प्रकारच्या विशेष नाकाबंदी मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

