गणेशोत्सवातून सामाजिक एकोपा व संस्कारांची जपणूक झाली पाहिजे योगी दत्तनाथ महाराज
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची विशेष बैठक
वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
गणेशोत्सव हा केवळ मनोरंजनाचा उत्सव न राहता धार्मिक संस्कार, सामाजिक एकोपा, समाजजागृती आणि युवकांना सकारात्मक दिशा देणारा उत्सव ठरला पाहिजे, असे प्रतिपादन योगी दत्तनाथ महाराज यांनी केले.
सकल हिंदू समाज, वरणगाव यांच्या वतीने शहरातील सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विशेष बैठक श्री विठ्ठल मंदिर, जुनी भाजीसाथ येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दोंडाईचा येथील योगी दत्तनाथ महाराजांसह शहरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि संस्कारांची जपणूक करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान बँडमध्ये अश्लील अथवा आक्षेपार्ह गाणी न वाजवता भक्तिगीते, देशभक्तीपर गीते तसेच समाजप्रबोधन करणारी गीते वाजवावीत, असे आवाहन करण्यात आले.

मिरवणुकीदरम्यान एखादे मंडळ पुढे-मागे जाणे, मिरवणुकीचा मार्ग किंवा अन्य कारणांवरून वाद निर्माण झाल्यास ते वादविवाद न करता आपापसात समन्वय व सामंजस्याने सोडवावेत. गणेशोत्सव आनंद, बंधुभाव आणि शांततेच्या वातावरणात साजरा करावा, असेही आवाहन करण्यात आले.
यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात ‘समरसता आरती’ आयोजित करून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा उपक्रम राबविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. तसेच युवकांचे मन आणि मनगट मजबूत करण्यासाठी लाठी-काठीचे पारंपरिक प्रशिक्षण आयोजित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. शिस्त, आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्ती आणि संघभावना वाढविणाऱ्या उपक्रमांना गणेश मंडळांनी प्राधान्य द्यावे, असे सांगण्यात आले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून वरणगावमध्ये सामाजिक एकोपा, बंधुभाव, संस्कार आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन सकल हिंदू समाज, वरणगाव यांच्या वतीने करण्यात आले.
“एकत्र विचार — एकत्र प्रयत्न — समाजासाठी सकारात्मक परिवर्तन!” या संकल्पनेतून यंदाचा गणेशोत्सव उत्साहात, शिस्तीत आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

